लहानपणापासूनच देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी ते लष्करात दाखल झाले. आसाममधील गुवाहाटी येथे बंडखोरांबरोबरच्या चकमकीत त्यांचा एक सहकारी जखमी झाला. त्याला उपचारांकरिता रुग्णालयात घेऊन जाताना रुग्णवाहिकेला एका बसची धडक बसली आणि ऐन तिशीतच त्यांना कमरेपासून खाली कायमचे अपंगत्व आले. या अपघातानंतर लष्कराच्या खडकीतील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. निराशेच्या गर्तेत असतानाच एके दिवशी त्यांच्या मनात खेळण्याची ऊर्मी जागी झाली आणि त्या ऊर्मीने त्यांना उभारी दिली. नंतर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

[jwplayer zOGMZ9UX]

ही कहाणी आहे सुरेशकुमार कार्की यांची. चीनमधील बीजिंग येथे होणाऱ्या आशियाई पॅरा बॅडमिंटन स्पर्धेसाठी कार्की आणि प्रेमकुमार आळे यांची निवड झाली आहे. या दोघांच्या आयुष्याकडे पाहिले की ‘अनंत अमुची ध्येयासक्ती’ या उक्तीची प्रचिती येते. सुरेशकुमार कार्की आणि प्रेमकुमार आळे ही जोडगोळी बीजिंग येथे होणाऱ्या आशियाई पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी आणि एकेरी या विभागांत भारताचे प्रतिनिधित्व करेल. ही स्पर्धा मंगळवार (२२ नोव्हेंबर) पासून सुरू होत आहे. हे दोघेही लष्करातील जवान आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये त्यांना कमरेपासून खाली अपंगत्व आल्याने ते खडकीतील पॅराप्लेजिक रिहॅबिलीटेशन सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल आहेत. नकारात्मकतेला दूर सारून येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी पुन्हा नवे आयुष्य सुरू केले आहे.    सुरेशकुमार हे २००४ मध्ये तर प्रेमकुमार हे २००९ मध्ये खडकीतील केंद्रात दाखल झाले. प्रेमकुमार हे सायकलवरून दिल्लीतील त्यांच्या युनिटकडे जात असताना बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्यांना पंगुत्व आले. नव्या आयुष्याला सुरुवात करताना दोघांचाही प्रवास नकारात्मकतेकडे होत होता. मात्र, खडकी पॅराप्लेजिक पुर्नवसन केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्यांच्यात केवळ जगण्याचीच ऊर्मी न जागवता आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने कसे जगता येईल, यासाठीही प्रयत्न केले. त्या प्रयत्नांमुळे दोघेही खेळांकडे वळले. टेबल टेनिस, अ‍ॅथलेटिक्स, बास्केटबॉल असे खेळ खेळताना बॅडमिंटनची विशेष रुची असल्यामुळे दोघांनी या खेळाचे रीतसर प्रशिक्षण घेतले. सन २०१३ मध्ये पॅरा नॅशनल स्पर्धेतही त्यांनी भाग घेतला आणि त्यात दोघांनी दुहेरीत क्लास वनमध्ये (व्हीलचेअर) सुवर्णपदक मिळवले आणि कार्की यांनी एकेरीमध्येही सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत त्यांनी अनुभवासाठी भाग घेतला होता. या स्पर्धेतील सुवर्णपदकांच्या कमाईने त्यांना आत्मविश्वास मिळाला. सध्या ते दोघेही पुणे जिल्हा मेट्रोपोलिटन बॅडमिंटन असोसिएशन येथे सराव करीत आहेत.

हा प्रवास खरोखरच खडतर आहे. सर्व काही व्यवस्थित चाललेले असताना अचानक एके दिवशी तुम्हाला समजते, की कमरेपासून खाली अपंगत्व आले आहे. त्यानंतर सावरून पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करणे माझ्यासाठी अवघड होते. वैद्यकीय संचालक कर्नल आर. के. मुखर्जी, अर्चना देवधर, अजित कुंभार यांच्या मदतीने आम्ही पुन्हा उभे राहू शकलो. आशियाई स्पर्धेत भारतातर्फे जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या तिघांचे आम्ही आभारी आहोत.  

– सुरेशकुमार कार्की

[jwplayer kDLYstr7]

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prem kumar ale and suresh kumar karki selected for para badminton