डोईवर मध्यभागी विठ्ठलाची प्रतिमा, ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ हा बुक्क्याने लिहिलेला अभंग, तुळशीच्या मण्यांनी केलेली बांधणी, टाळ, चिपळ्या अशा वारकरी संप्रदायाच्या प्रतीकांचा वापर करून ‘तुकाराम पगडी’ सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंगळवारी ( १४ जून) देहू येथे तुकाराम पगडी आणि अभंग लिहिलेल्या उपरण्याने स्वागत केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुकारामांची पगडी आणि उपरणे भेट
देहू संस्थांनच्या विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांनी ही तुकाराम डिझायनर पगडी साकारली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यावेळी त्यांना तुकारामांची पगडी आणि उपरणे भेट म्हणून देण्यात येणार आहेत. ही पगडी रविवारी (१२ जून) देहू संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली जाणार आहे.

असे असेल स्वरुप
पगडीविषयी माहिती देताना गिरीश मुरुडकर म्हणाले, जगद्गुरू तुकाराम महाराज वापरत होते तशा स्वरूपाची या पगडीची रचना करण्यात आली आहे. बदामी रंगाच्या रेशमी वस्त्राची तुळशीच्या मण्यांचा वापर करून ही पगडी बांधण्यात आली आहे. पगडीच्या मध्यभागी बुक्क्याचा वापर करून विठ्ठलाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी’ हा अभंग सुलेखनाद्वारे रेखाटला आहे. ही पगडी पंतप्रधानांच्या मस्तकावर ठेवण्यात येईल तेव्हा चंदन आणि बुक्क्याचा टिळा आपोआप येईल अशी रचना करण्यात आली आहे. पगडीच्या कानापाशी उजव्या बाजूला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि डाव्या बाजूला जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा दिसतील. सजावट करताना दोन्ही बाजूला लोडवर चिपळी आणि टाळ ही प्रतिके ठेवण्यात आली आहेत. उपरण्यावर दोन्ही बाजूला तुकाराम महाराजांचा मराठी आणि हिंदी अभंग सुलेखनाद्वारे कोरण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Production of special tukaram designer turban for pm narendra modi dpj