राज्यघटना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास | Loksatta

राज्यघटना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास

राज्यघटनेचा हीरकमहोत्सव साजरा होत असताना २०१० मध्ये मी या कामाकडे आकर्षित झालो.

राज्यघटना सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास
भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या तब्बल १७ हजार प्रतींची विक्री झाली आहे

प्रा. सुभाष वारे यांची दोनशे व्याख्याने; ‘आपले भविष्य : भारतीय संविधान’ पुस्तकाच्या १७ हजार प्रतींची विक्री

जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशातील नागरिकांना राज्यघटनेतील मूल्यांची, आपले अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव करून देण्यासाठी झटत असलेले प्रा. सुभाष वारे यांच्या प्रसिद्धीपासून लांब राहून प्रभावीपणे राबवीत असलेल्या अभियानाची सप्तपदी पूर्ण होत आहे. राज्यघटनेतील मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत दोनशे व्याख्याने दिली आहेत. राज्यघटनेच्या मूल्यांचा प्रचार करणारी कार्यकर्त्यांची फळी उभारताना त्यांच्या हाताशी सामग्री असावी या उद्देशातून त्यांनी लिहिलेल्या ‘आपले भविष्य : भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या तब्बल १७ हजार प्रतींची विक्री झाली आहे.

समाजवादी विचारांचे पूर्णवेळ कार्यकर्ते ही प्रा. सुभाष वारे यांची ओळख. राष्ट्र सेवादल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, राष्ट्रीय एकात्मता समिती, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन, सामाजिक कृतज्ञता निधी अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. मात्र, गेल्या सात वर्षांपासून राज्यघटनेतील मूल्यांचा प्रचार आणि प्रसार या कामामध्येच त्यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. हे काम केवळ आत्मकेंद्री न ठेवता त्याचा विस्तार करीत त्यांनी राज्यघटनेतील मूल्यांच्या प्रचारासाठी उत्तम व्याख्यान देणारे २५ व्याख्याते घडविले आहेत. या कार्यकर्त्यांना साधनसामग्री उपलब्ध व्हावी आणि सामान्य नागरिकांना राज्यघटनेतील माहिती सुलभपणे व्हावी या उद्देशातून त्यांनी ‘आपले भविष्य : भारतीय संविधान’ या पुस्तकाचे लेखन केले आहे.

राज्यघटनेचा हीरकमहोत्सव साजरा होत असताना २०१० मध्ये मी या कामाकडे आकर्षित झालो. महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधताना त्यांना राज्यघटनेविषयी काहीच माहिती नाही. इतकेच नाही तर राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही घटना वाचलेली नाही ही बाब मला प्रकर्षांने जाणवली. त्यानंतर एस. एम. जोशी फाउंडेशन येथे समाजवादी संस्था-संघटनांची बैठक घेऊन यासंदर्भात कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांला या कामाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले. तेव्हा घटनेतील मूल्यांच्या प्रचाराचे काम करण्यासाठी उत्तम वक्ते घडविण्याच्या उद्देशातून कार्यकर्त्यांचे तीन दिवसांचे वक्ता प्रशिक्षण शिबिर घेतले होते. त्याला ८० कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला. त्यापैकी २५ कार्यकर्ते उत्तम व्याख्याते झाले असून ते राज्यघटनेच्या प्रचाराचे काम प्रभावीपणे करीत आहेत, असे वारे यांनी सांगितले. वक्ते घडविण्यासाठी राज्यघटनेच्या वेगवेगळ्या पैलूंवर आधारित ९६ तासांचा अभ्यासक्रम निश्चित केला. पुणे, औरंगाबाद आणि मुंबईतील गोरेगाव येथे दर रविवारी आठ तास याप्रमाणे १२ आठवडे हा अभ्यासक्रम घेण्यात आला होता. ही चळवळ व्यापक करायची तर या युवा कार्यकर्त्यांना भाषण करताना हाताशी साधनसामग्री हवी या उद्देशातून सोप्या भाषेत संविधानाची मूल्ये उलगडणारे ‘आपले भविष्य : भारतीय संविधान’ हे ८२ पृष्ठांचे पुस्तक मीच लिहिले. एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गेल्या वर्षी २० ऑगस्ट रोजी या पुस्तकाचे प्रकाशन केले. केवळ ३० रुपये किंमत असलेल्या या पुस्तकाच्या वर्षभराच्या आत १७ हजार प्रतींची विक्री झाली आहे. आतापर्यंत दोनशे कार्यक्रम झाले असून केवळ कार्यक्रमांच्या ठिकाणीच या पुस्तिकेची विक्री होते, असेही वारे यांनी सांगितले.

राज्यघटनेविषयी गैरसमजच अधिक

भारताची राज्यघटना ही केवळ सर्वोच्च न्यायालय आणि संसदेसाठी आहे असा गैरसमज अगदी सुशिक्षितांमध्येही आढळून आला, असे निरीक्षण प्रा. सुभाष वारे यांनी नोंदविले. घटना ही तुमच्या-माझ्या घरासाठी आहे. घटनेतील तत्त्वांची अंमलबजावणी केली तर महागाईचा मुकाबला कसा करावा, शेतमालाला भाव आणि महिलांची सुरक्षा असे दैनंदिन प्रश्न सुटू शकतात. गोवंशहत्या बंदी, मराठा आणि मुस्लिम आरक्षण यासंदर्भात घटनेमध्ये नेमके काय म्हटले आहे याविषयी मी व्याख्यानातून मांडतो, असेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-08-2017 at 04:22 IST
Next Story
नव्या पिढीच्या सूत्रसंचालकांचा अभ्यास कमी