पुणे : पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील धोकादायक झालेली झाडे तसेच फांद्या काढून टाकण्याचे आदेश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी गुरुवारी दिले. नागरिकांकडून तक्रार करण्यात येईल, त्यानंतर धोकादायक फांद्या काढू, यावर अवलंबून न राहता स्वत: पाहणी करून पावसाळा सुरू होण्याआधी ही कामे पूर्ण करा, अशा सूचना पृथ्वीराज यांनी उद्यान विभागाला दिल्या आहेत.

पावसाळापूर्व कामांना शहरात सुरुवात करण्यात आली आहे. नाले, पावसाळी गटारे, ड्रेनेज, चेंबर्स साफ करण्याची कामे सुरू झाली आहेत. ही कामे करताना अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडलेल्या आढळल्या. काही भागांत धोकादायक झाडे आणि फांद्या असल्याचे समोर आले आहे. यापैकी काही झाडे ही सोसायट्यांच्या आवारात असून, त्याच्या फांद्या बाहेर आलेल्या आहेत. या फांद्या धोकादायक झाल्याने पदपथावरून चालणाऱ्या नागरिकांसाठी त्या धोकादायक ठरत आहेत.

रस्त्यावरील धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून केली जात आहे. मात्र, खासगी सोसायटीच्या आवारात असलेल्या आणि ज्यांच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत, त्यांची छाटणी करायची झाल्यास सोसायटीने अर्ज केला तरच या फांद्या तोडू, अशी भूमिका उद्यान विभागातील कर्मचारी घेत आहेत. त्यामुळे अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सोसायटीने तक्रार दिल्यानंतरही उद्यान विभागाचे कर्मचारी अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही, असे सांगत धोकादायक ठरणाऱ्या फांद्या काढत नसल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे तक्रारींची किंवा सोसायटीच्या अर्जांची वाट न पाहता रस्त्यावर असलेल्या झाडांच्या फांद्या तातडीने काढण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी केल्या आहेत. धोकादायक झाडे तसेच फांद्या काढण्याच्या कामासाठी उद्यान विभागाकडे ४७ वाहने असून, त्या माध्यमातून ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.