पुणे : विमाननगर भागातील एका बहुराष्ट्रीय ‘बीपीओ’च्या आवारात झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील बीपीओ, तसेच आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नियमावली (एसओपी) तयार केली आहे. बीपीओ आणि आयटी कंपन्यांच्या प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. या नियमावली पालन करण्यात येते का नाही, याची खातरजमा पोलिसांकडून वेळोवेळी केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयटी कंपन्यांमधील महिलांच्या सुरक्षेसाठी मगरपट्टा सिटी येथे बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मगरपट्टा सिटी आयटी पार्क भागातील कंपन्यांचे अधिकारी, तसेच कर्मचारी वर्ग सहभागी झाला होता. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार बोलत होते.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘शहरात मोठ्या संख्येने खासगी कंपन्या आहेत. विविध कंपन्यांमध्ये महिला कर्मचारी आहेत. दिवसा आणि रात्री कंपन्यांचे कामकाज चालते. आयटी कंपनीतील महिलांची नेे-आण करण्यासाठी कंपनीकडून मोटार आणि बससेवा उपलब्ध करून दिली जाते. पुणे शहर परिसरात काही वर्षांपूर्वी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांवर अत्याचार करून खून करण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. खून प्रकरणात मोटार सेवा देणाऱ्या (कॅॅब) चालक सामील झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यावेळी आयटी क्षेत्रातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. पोलिसांनी आयटी आणि बीपीओ कंपन्यांना मार्गदर्शक नियमावली तयार करून दिली होती. या नियमावलींचे पालन केल्याने गंभीर गुन्ह्यांना आळा बसला होता.’

विमाननगर भागातील बीपीओत झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने मार्गदर्शिका, नियमावली तयार करण्यात आली आहे. याचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमावलीचे पालन काटेकोरपणे होते का नाही, याची खातरजमा पोलिसांकडून करण्यात येणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

नियमावलीत काय ?

कंपनीतील महिलांची सुरक्षा आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी अंतर्गत समिती स्थापन करणे बंधनकारक

या समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी, महिला कर्मचारी, सुुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश

एखाद्या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असेल, तर संबंधित कंपनीने केलेेल्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची पाहणी आणि निरीक्षण (सिक्युरिटी ऑडिट) स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना करावे लागणार

पोलीस अधिकारी, उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी, कंपनीतील अधिकाऱ्यांचा समावेश असलेला समूह समाज माध्यमात स्थापन करावा लागणार

कंपनीतील प्रवेशद्वार, अंधारातील जागा, पार्किंगची जागा, तसेच परिसरातील रस्त्यांची अचानकपणे पहाणी केली जाणार

संवाद आणि सहयोग

कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षा, जलद आणि सुलभ संवादासाठी कंपनीचे सुरक्षा प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, पोलिसांचा एकमेकांशी संवाद असणे गरजेचे आहे. ज्या कंपनीत महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहेत. अशा कंपन्यांची पाहणी गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येणार आहे. तेथे पुणे पोलिसांच्या माय सेफ पुणे योजनेची भित्तीपत्रके, तसेच क्यूआर कोड लावण्यात येणार आहे. पोलिसांकडून कंपन्यांच्या आवारात नियमित गस्त घालण्यात येणार आहेत, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर

आयटी कंपनीसह खासगी कंपनीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांकडून पाहणी करण्यात येणार आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्या भागात कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. तेथे कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वार, बाहेर पडण्याचा मार्ग, कंपनीच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला कर्मचाऱ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांची चारित्र्य पडताळणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वाहनांची देखभाल, तसेच जीपीएस यंत्रणेचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महिला कर्मचाऱ्यांच्या सूचना आणि अभिप्राय जाणून घेण्यात येणार आहेत. महिला कर्मचाऱ्यांना जाणवणाऱ्या समस्यांबाबत नियमित संवाद सत्रे आयोजित केली जाणार आहेत. महिला कर्मचाऱ्यांचा छळ, तसेच तक्रारी जाणून घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune after womans murder at bpo police issued an sop for womens safety in it companies pune print news rbk 25 sud 02