पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केल्या जाणाऱ्या (पार्क) वाहनांमुळे विमान प्रवाशांना फटका बसत असून, वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्यांवर कारवाई करून रस्ता रुंदीकरणाबाबत कार्यवाही करावी, असे पत्र महानगरपालिकेला पाठवले आहे, तर विश्रांतवाडीकडून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव विचाराधीन असून, वाहतूक पोलिसांच्या मदतीने एकत्रित कार्यवाहीची मोहीम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले.

पुणे विमानतळावरून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू असून प्रवाशांकडून हवाई प्रवासाला पसंती दिली जात आहे. नियोजित विमानाच्या आरक्षणानुसार प्रवासी विमानतळापर्यंत जाण्यासाठी दोन तास अगोदर प्रवास सुरू केला, तरी विमानतळावर पोहचण्यासाठी त्यांना अडथळे पार करत जावे लागत आहे. परिसरात एरोमाॅल, शैक्षणिक संस्था आणि मोठ्या संख्येने निवासी इमारती, पंचतारांकित हाॅटेल असल्याने या मार्गावर वाहनांची गर्दी वाढली आहे.

अनेक कॅबचालक रस्त्यालगत उभे राहिल्याने वाहतूक मंद गतीने सुरू असते. तसेच, विश्रांतवाडी रस्त्यावर खाद्यपदार्थ, उपाहारगृह आणि पथारीवाल्यांची अतिक्रमणे वाढली असून, विमानतळ परिसरातील रस्ता अरूंद झाला आहे.

‘या परिसरातील वाहतूक कोंडी ही नियमित बाब झाली आहे. नियोजित विमान प्रवास करताना तिकीट आणि प्रवासी साहित्य, पिशव्या तपासणी, बोर्डिंग पास आणि इतर तपासणीसाठी दोन तास अगोदर पोहोचणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रवासी खूप आधी घरातून निघाले, तरी मंद वाहतूक, कोंडी या समस्यांमुळे विमानतळापर्यंत पोहचणे जिकिरीचे ठरत आहे,’ अशी माहिती विमान प्रवासी दिनेश पाटील यांनी दिली.

विश्रांतवाडी ते विमानतळ रस्त्यालगत ‘नर्सरी’च्या व्यापाऱ्यांनी मोठे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे हा रस्ता अरूंद झाला असून, वाहनांना अडथळा होत आहे. त्यामुळे या नर्सरींवर आणि इतर छोट्या-मोठ्या अतिक्रमणधारकांवर कारवाई करून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे, असे पत्र महापालिकेला पाठविले आहे. – रवींद्र कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ रस्ता वाहतूक विभाग

पुणे विमानतळ परिसराकडे विश्रांतवाडीकडून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच, येथील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या मदतीने एकत्रित कार्यवाहीची मोहीम हाती घेण्यात येईल. – नवल किशोर राम, आयुक्त, महानगरपालिका, पुणे</strong>.