पुणे : देशातील सर्वांत जुन्या खडकी कटक मंडळाचे ब्रिटिशकालीन ‘किरकी’ हे नाव बदलून आता अधिकृतरित्या ‘खडकी’ करण्यात आले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने २९ ऑगस्ट रोजी त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले असून, तब्बल दोनशे वर्षांनंतर खडकीला मूळ नाव प्राप्त झाले आहे.

लष्करी नोंदींनुसार मराठा आणि ब्रिटिश यांच्यात १८१७मध्ये झालेल्या युद्धात ब्रिटिशांनी विजय मिळवून पुण्यावर ताबा मिळवला. त्यानंतर लगेच छावणी उभारण्यात आली. मात्र, ब्रिटिशांना खडकी हे नाव उच्चारता न आल्याने तत्कालीन कागदपत्रांमध्ये करण्यात आलेली किरकी ही नोंद पुढे तशीच सुरू राहिली.

ब्रिटिशांनी स्थापन केलेला लष्करी तळ पश्चिम भारतातील पहिल्या कायमस्वरूपी लष्करी तळांपैकी एक झाला. तोफखाना, घोडदळ, शस्त्रसाठा आगार, दारूगोळा कारखाना, शस्त्रास्त्र आगार यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी दगडी बंगलेही बांधण्यात आले. सद्यःस्थितीत खडकी येथे लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअर ग्रुपसह शाळा, रुग्णालये, लष्करी जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीची वसाहत आहे. तसेच, वॉर सिमेट्रीमध्ये १,६०० हून अधिक जवानांची समाधी आहे.

‘खडकीतील प्रत्येक परेड मैदान, प्रत्येक बॅरेकमध्ये इतिहास दडलेला आहे. ‘किरकी’ हे नाव ब्रिटिशांनी करून घेतलेली सोय होती. ब्रिटिशांना मूळ नाव उच्चारता येत नसल्याने त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे नाव बदलले. दुर्दैवाने ते नाव तसेच टिकून राहिले. मात्र, आता करण्यात आलेला बदल हा केवळ नामबदल नसून, त्या लढाईतून उगम पावलेल्या लष्करी संस्थांचा सन्मान परत देणारा आहे, असे दक्षिण मुख्यालयाच्या संरक्षण स्थावर मालमत्ता प्रधान संचालनालयाचे वरिष्ठ संचालक अमोल जगताप यांनी सांगितले. २०१७ मध्ये खडकी कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना जगताप यांनीच नामबदलाची प्रक्रिया सुरू केली होती.

खडकी येथे आजही लष्कराच्या अनेक संस्था आहेत. संरक्षण विभागाच्या जमीन नोंदी जपण्यापासून आधुनिक युद्धतंत्राच्या प्रशिक्षणापर्यंतची कामे या संस्थांद्वारे केली जातात. त्यामुळे खडकीचा परिसर वसाहतकालीन रेजिमेंट्सपासून भारतीय सैन्यापर्यंतच्या लष्करी उत्क्रांतीचा साक्षीदार आहे, असेही जगताप यांनी सांगितले.