पुणे : गणपती विसर्जनानंतर कृत्रिम तलाव, हौद, नैसर्गिक तलाव, नदी, कॅनॉल यांसह विविध जलस्त्रोतांमध्ये तरंगत्या, अर्धवट तरंगत्या किंवा संकलित केलेल्या गणेश मुर्तींचे छायाचित्रण, तसेच त्यांची छायाचित्रे आणि चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अशा प्रकारच्या छायाचित्रांमुळे धार्मिक भावना दुखावण्याची तसेच सार्वजनिक शांततेस बाधा येण्याची शक्यता असल्याने शहर पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी हा आदेश जारी केला आहे.
आदेशाचे उल्लंघन करणार्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. हा मनाई आदेश १५ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.