पुणे : कारवाईची भीती दाखवून सायबर चोरट्यांकडून नागरिकांची फस‌वणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तपासणीच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी एका महिलेचा विनयभंग केल्याचे उघडकीस आले आहे. विमानतळावर महिलेच्या नावाने पाठविलेल्या पाकिटात अमली पदार्थ सापडल्याची भीती दाखवून थर्मल इमेजिंगच्या नावाखाली चोरट्यांनी महिलेला विवस्त्र होण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहेत. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तुमच्या नावाने मलेशिया येथे पाठविण्यात येणाऱ्या पाकिटात बनावट पारपत्र, एटीएम कार्ड आणि अमली पदार्थ सापडले आहे, अशी बतावणी चोरट्यांनी महिलेकडे केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. पाकिटात अमली पदार्थ सापडल्याने अटक करण्यात येणार असल्याचे चोरट्यांनी सांगितले. तेव्हा महिलेने पाकिटाशी माझा संबंध नसल्याचे चोरट्यांना सांगितले. तेव्हा सायबर चोरट्यांनी महिलेला पोलिसांकडून नाहरकत प्रमाणपत्र मिळवाले लागेल, असे महिलेला सांगितले.

हेही वाचा…पिंपरी : कांदा चाळीप्रमाणे आता बेदाणे शेडसाठी दहा लाखांचे अनुदान

दिल्लीतील वसंतकुंज पोलीस ठाण्यातून बोलत असल्याची बतावणी करून चोरट्यांनी एका बँकेत महिलेला पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने दोन लाख २२ हजार रुपये पाठविले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर पुन्हा संपर्क साधला. तुम्ही अमली पदार्थ शरीरात लपवले आहेत. थर्मल इमेजिंग करायची आहे, अशी बतावणी केली. चोरट्यांनी महिलेला ‘व्हिडीओ कॉल’ केला. चोरट्यांनी महिलेला विवस्त्र होण्यास भाग पाडले, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.