पुणे : आवक वाढल्याने बटाटा, टोमॅटोच्या दरात घट; आले, मटार तेजीत

अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती

Pune MarketYard
(संग्रहीत छायाचित्र)

पुण्यातील मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे. बाजारात गेल्या काही दिवसांपासून आल्याची आवक कमी होत असून आल्याच्या दरात वाढ झाली आहे.

रराज्यातील मटारच्या दरात वाढ झाली आहे. आवक वाढल्याने बटाटा, टोमॅटोच्या दरात घट झाली असून अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारी (२६ जून) राज्य तसेच परराज्यातून ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून मिळून १० ट्रक हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकातून २ टेम्पो घेवडा, इंदूरहून ३ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून मिळून १४ ते १५ ट्रक लसूण, मध्यप्रदेशातून १५० गोणी मटार, कर्नाटकातून ३ टेम्पो तोतापुरी कैरी, आग्रा, इंदूर, गुजरातमधून मिळून ५५ ते ६० ट्रक बटाटा अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती घाऊक बाजारातील प्रमुख अडते विलास भुजबळ यांनी दिली.

पुणे विभागातून सातारी आले ५०० ते ६०० गोणी, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो दहा ते बारा हजार पेटी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, गाजर ५ ते ६ टेम्पो, गावरान कैरी ४ ते ५ टेम्पो, कांदा ७० ट्रक अशी आवक बाजारात झाली.

कोथिंबीर वगळता अन्य पालेभाज्या तेजीत –

गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. कोथिंबर वगळता अन्य पालेभाज्यांचे दर तेजीत आहेत. मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, अंबाडी, मुळा, राजगिरा, चवळई आणि पालकाच्या दरात वाढ झाली आहे. पुदीना आणि चुक्याचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पावणेदोन लाख कोथिंबीर जुडी, मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली. घाऊकबाजारात आवक वाढल्याने कोथिंबिरीच्या जुडीमागे २ रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या एका जुडीची दर २० ते २५ रुपये आहेत.

खरबूज, पपई, चिकूच्या दरात वाढ –

घाऊक फळबाजारात खरबूज, पपई, चिकूच्या दरात वाढ झाली. लिंबू, कलिंगड, पपई, अननस, पेरू, संत्री, मोसंबी, डाळिंबाचे दर स्थिर आहेत. फळबाजारात केरळहून ३ ट्रक अननस, डाळिंब ३५ ते ४० टन, मोसंबी २५ ते ३० टन, संत्री १ ते दीड टन, कलिंगड ३ ते ४ ट्रक, खरबूज २ ते ३ टेम्पो, लिंबे १५०० ते १६०० गोणी, पपई ७ ते ८ टेम्पो, पेरू १५० ते २०० क्रेट्स (प्लास्टिक जाळी) अशी आवक फळबाजारात झाली.

हलवा, सुरमई वगळता अन्य मासळीच्या दरात घट –

पावसाळी वातावरणामुळे कोकण किनारपट्टीवरुन होणारी मासळीची आवक बंद झाली आहे. मासळी बाजारात सध्या परराज्यातून मासळीची आवक होत आहे. हलवा, सुरमई वगळता अन्य मासळींच्या दरात घट झाली आहेत. गणेश पेठीतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळी ७ ते ८ टन, खाडीतील मासळी १०० ते २०० किलो, नदीतील मासळी १ ते दीड टन तसेच आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलन या मासळीची एकुण मिळून १५ ते २० टन आवक झाल्याची माहिती मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. चिकन, अंड्यांचे दर स्थिर असल्याचे चिकन विक्रेते रुपेश परदेशी यांनी सांगितले. मटणाचे दर स्थिर असल्याचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune decrease in prices of potatoes and tomatoes due to increase in income ginger peas boom pune print news msr

Next Story
सिंहगडावर ट्रेकिंग दरम्यान कडा कोसळून पुण्यातील तरूण गिर्यारोहकाचा मृत्यू
फोटो गॅलरी