पुणे : नदीपात्रात, रस्त्याकडेला, तसेच मोकळ्या जागांवर राडारोडा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली आहे. मात्र, याकडे क्षेत्रीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत राडारोडा आढळल्यास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. रात्री अंधाराचा फायदा घेत सर्रासपणे नदीपात्र, नाले, तसेच रस्त्यांच्या कडेला राडारोडा टाकण्याचे प्रकार समोर आले आहेत. महापालिकेने शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, असे असतानाही क्षेत्रीय कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आल्याने, ज्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत राडारोडा टाकलेला दिसेल, तेथील कर्मचारी-अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले. याबाबतचे परिपत्रक कदम यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना पाठवले आहे.

हेही वाचा – पुणे : रस्त्यांवरील ड्रेनेज चेंबरची झाकणे पुन्हा ‘खड्ड्यात’ !

शहरातील राडारोडा उचलण्याबाबत आणि राडारोडा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याबाबत यापूर्वी महापालिकेच्या आयुक्त कार्यालयाकडून आदेश, तसेच सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. बांधकामातून, तसेच महापालिकेच्या विविध विकासकामांतून तयार होणारा राडारोडा, माती, दगड-विटांचे तुकडे, अन्य कचरा हा सर्रासपणे नदीपात्र, ओढे-नाले, रस्त्याच्या कडेला, मोकळ्या जागेत टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याला अडथळा होऊन पूर परिस्थिती निर्माण होते.

राडारोडा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात सन २०१७ च्या उपविधी, कलम ५२, घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ व पर्यावरण कायद्यान्वये दंड वसूल केला जाणार आहे. तसेच संबंधितांच्या मिळकतीवरील बांधकाम परवानगीदेखील रद्द करण्यात येणार आहे, असे कदम यांनी सांगितले.

हेही वाचा – पुणे महापालिकेत आता अत्याधुनिक संकट व्यवस्थापन कक्ष, काय आहे कारण ?

राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन व महापालिका सहायक आयुक्त कार्यालयांकडील महापालिका सहायक आयुक्त, बांधकाम निरीक्षक, विभागीय सॅनिटरी इन्स्पेक्टर, सॅनिटरी इन्स्पेक्टर यांचे संयुक्त गस्ती पथक, संबंधित उपायुक्त (परिमंडळ) यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आले आहे. रस्त्यावर, तसेच नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. उपायुक्त (परिमंडळ), महापालिका सहायक आयुक्त, बांधकाम निरीक्षक, विभागीय सॅनिटरी इन्स्पेक्टर, सॅनिटरी इन्स्पेक्टर यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे, असेही उपायुक्त संदीप कदम यांनी सांगितले.

महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले, राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी गस्तीपथक स्थापन करण्यात आले आहे. तसेच रस्त्यावर, नदीपात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune disciplinary action municipal corporation against officials neglecting debris pune print news ccm 82 ssb