गावरान आंब्यांचा हंगाम बहरात ; मुळशी, वेल्हा, भोरमधून आवक

नैसर्गिकरित्या पिकवलेल्या गावरान आंब्यांना मागणी चांगली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दर चांगले मिळाले आहेत.

gavran mango
गावरान आंब्यांचा हंगाम यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहणार आहे.

पुणे : गोड, रसाळ, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या गावरान हंगाम बहरात आला आहे. दरवर्षी जून महिन्याच्या अखेरपर्यंत चालणारा गावरान आंब्यांचा हंगाम यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु राहणार आहे.

गावरान आंब्यांची आवक पुणे जिल्ह्यातील मुळशी, वेल्हा, भोर भागातून होत आहे. मुळशी, भोर, वेल्हा भागात पावसाने ओढ दिली आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर गावरान आंब्यांचा हंगाम संपतो. या भागात यंदा पाऊस न झाल्याने गावरान आंब्यांचा हंगाम १० जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील गावरान आंब्यांचे व्यापारी यशवंत कोंडे यांनी दिली.

नैसर्गिकरित्या पिकवलेल्या गावरान आंब्यांना मागणी चांगली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दर चांगले मिळाले आहेत. फळबाजारात गावरान हापूसचे ५० ते ६० डाग, पायरीचे ३० ते ४० डाग, रायवळ आंब्यांचे ७० डाग तसेच गोटी आंब्याचे ३० ते ४० डाग अशी आवक झाली. एका डागात (टोपलीत) साधारपणपणे ७ डझन आंबे असतात. एक डझन तयार गावरान हापूसचे ३०० ते ३५० रुपये दर आहेत. एक डझन पायरी आंब्यांचे दर १५० ते २०० रुपये आहेत. एक डझन रायवळ आंब्यांचे दर ५० ते १५० रुपये आहेत. गोटी आंब्यांचे दर २० ते ३० रुपये असल्याचे कोंडे यांनी सांगितले.

करोना संसर्गामुळे गेले दोन वर्ष गावरान आंब्यांच्या विक्रीवर परिणाम झाला होता.. अद्याप मुळशी तालुक्यात पाऊस सुरू झाला नाही. पावसात आंब्यांच्या प्रतवारीवर परिणाम होताे. आंब्यांची प्रतवारी चांगली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा गावरान आंब्यांना दर चांगले मिळाले आहेत.– शुभम गुजर, गावरान आंबा उत्पादक शेतकरी, गुजरवाडी, ता. मुळशी, जि. पुणे

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune gavran mango season will continue till the first week of july pune print news zws

Next Story
पिंपरी-चिंचवड : बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक; सचिन आहिरांसमोर व्यक्त केल्या भावना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी