Husband Record Wife Bathing Video: पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील आंबेगाव येथे घडली आहे. पत्नीवर संशय घेऊन तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी पतीने स्वतःच्याच घरात आणि बाथरूममध्ये स्पाय कॅमेरे बसविले. पत्नीचे आंघोळ करतानाचे आणि इतर खासगी व्हिडीओ चित्रीत करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या व्हिडीओच्या आधारे पतीनेच पत्नीला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदर प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पीडिते महिलेने याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पतीसह सासरच्या सात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तांत्रिक पुरावे, व्हिडीओ आणि इतर बाबींची चौकशी केली जात आहे. संबंधित तक्रारदार महिला आणि तिचा पती शासकीय नोकरदार असल्याचे सांगितले जाते.
३० वर्षीय तक्रारदार महिलेचे आरोपी पतीबरोबर २०२० साली लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या काही काळानंतर पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागला, असे पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. शिवीगाळ आणि मारहाण करून माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावाही पत्नीने केला आहे.
घर आणि गाडीच्या हप्त्यांसाठी पैसे मागितले
एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, पतीने घर आणि गाडीचा हप्ता चुकविण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणण्यासाठी छळ केला, असा आरोप पत्नीने केला आहे. पती आणि सासरच्या लोकांच छळ सहन झाल्यामुळे अखेर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.