पुणे : मेट्रोची वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन’कडून ‘ई-बाईक’ ही पूरक सेवा सुरू केली आहे. त्यासाठी महामेट्रोने ‘टीएस स्विच ई-राइड प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीबरोबर करार केला आहे. मेट्रोतून प्रवास केल्यानंतरही अपेक्षित ठिकाणी प्रवाशाला जाता येणार आहे. ‘महामेट्रो’ने ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पुणे मेट्रो’च्या विविध मार्गांवरील ३३.२ किलोमीटर अंतराच्या प्रवासाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या मेट्रोतून प्रतिदिन दीड लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत असून, भविष्यात ही संख्या वाढणार आहे. प्रवासीसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने मेट्रोकडून ई-बाईक सेवा सुरू केली आहे. एखाद्या प्रवाशाला मेट्रोतून उतरल्यानंतर अपेक्षित ठिकाणी जाऊन पुन्हा त्याच ठिकाणाहून मेट्रोने माघारी परतायचे असेल, तर संबंधित प्रवाशाला प्रतितासानुसार माफक शुल्क आकारून सेवेचा फायदा घेता येणार आहे. प्रवाशांना कालावधीनुसार भाडेशुल्क आकारून सहज प्रवास करता येणे शक्य होणार आहे. सध्या प्राथमिक स्तरावर मेट्रो आणि कंपनीने दहा स्थानकांची निवड केली आहे.

‘स्विच ई-राइड’ या ब्रँडच्या नावाने ५० ई-बाइकमार्फत ही सेवा दिली जाणार आहे. त्यासाठी मेट्रो प्रवाशांना मोबाइल अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यात सरकारी ओळखपत्र किंवा निवासी पुरावा, वीज बिलाची नोंदणी बंधनकारक आहे. त्यानंतरच सुविधेचा लाभ घेता येणार आहे. दरम्यान, सुरक्षितेच्या अनुषंगाने कंपनीने लाइव्ह ट्रॅकिंग आणि सहायतेसाठी ग्राहक सेवा, जिओ-फेन्सिंग सक्षम केली आहे. दहा मेट्रो स्टेशनवर बॅटरी चार्जिंग केंद्र असणार आहेत. पुणे मेट्रोच्या पीसीएमसी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, दापोडी, शिवाजीनगर, मंडई, स्वारगेट, रुबी हॉल क्लिनिक, आनंदनगर, वनाझ या दहा स्थानकांवर ही सेवा प्रदान करणार आहे.

ईबाईकचे दर

● १ तास – ५५ रुपये

● ४ तास – २०० रुपये

● ६ तास – ३०५ रुपये

● २४ तास – ४५० रुपये

ईबाइकची वैशिष्ट्ये

● एका वेळी दोन व्यक्तींचा (१५० किलो) सहज प्रवास

● पाच मिनिटांत बॅटरी चार्जिंग

● एका चार्जिंगमध्ये ८० किलोमीटर अंतराचा प्रवास

● ई-बाईक बंद पडल्यास मदतीसाठी मोबाइल अॅपवर ‘एसओएस’ बटन

● मोबाइल अॅपद्वारेच ई-बाईक बंद-सुरू करण्याची सुविधा

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mahametro launches e bike to increase passenger numbers pune print news vvp 08 ssb