संजय जाधव, लोकसत्ता

पुणे : को-वर्किंग स्पेस म्हणजेच कार्यालयीन जागा सहकार्याला पुणेकरांची पसंती दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील नवउद्यमी (स्टार्टअप), छोट्या आणि मध्यम कंपन्यांकडून स्वतंत्र कार्यालयाऐवजी को-वर्किंग स्पेसला प्राधान्य दिले जात आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांच्या परिसरात या सुविधा असून, शहरातील मध्यवर्ती भागांतही काही वर्षांपासून त्यांचा विस्तार सुरू आहे.

पुण्यात सध्या को-वर्किंग स्पेस एकूण ९० लाख चौरस फुटांच्या आहेत. त्यात प्रामुख्याने स्मार्टवर्क्स, टेबल स्पेल, इंडीक्यूब, ऑफिस, रेडब्रिक, वीवर्क आणि अर्बन वर्क यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांची सुविधा प्रामुख्याने आयटी कंपन्यांची संख्या जास्त असलेल्या बाणेर, बालेवाडी, विमाननगर, कल्याणीनगर आणि कोरेगाव पार्कमध्ये आहेत. को-वर्किंग स्पेसचा विचार करता तिथे काम करणाऱ्या कंपन्या या प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान, सॉफ्टवेअऱ, अभियांत्रिकी, आरोग्यसुविधा आणि औषधनिर्माण क्षेत्रातील आहेत, अशी माहिती सीबीआरई इंडियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुमन मॅगझीन यांनी दिली.

आणखी वाचा-पिंपरी : ‘कॉर्पोरेशन’ ऐवजी ‘कन्स्ट्रक्शन’झाले आणि…!

आता स्थानिक कंपन्यांही या क्षेत्रात उतरू लागल्या आहेत. त्यांच्याकडून पुण्यातील मध्यवर्ती भागात प्रभात रस्ता, कोथरूड यासारख्या ठिकाणी सुविधा सुरू केल्या जात आहेत. सीसी अँड को कंपनीकडून प्रभात रस्ता, औंध रस्ता आणि कोथरूड येथे ही सुविधा दिली जाते. करोना संकटानंतर स्वतंत्र कार्यालयीन जागेसाठी खर्च करण्यापेक्षा को-वर्किंग स्पेसमध्ये कार्यालय सुरू करण्यास पसंती मिळत आहे. करोना संकटानंतर को-वर्किंग स्पेसमध्ये सुरू असलेली वाढ अद्याप कायम आहे. आगामी काळात ती वाढत जाण्याचा अंदाज आहे. सध्या शहरात को-वर्किंगचे दर एका खुर्चीसाठी दरमहा ३ ते ३० हजार रुपयांदरम्यान आहेत. सुविधा कोणत्या ठिकाणी आहे, त्यानुसार दर कमी अथवा जास्त होतात.

को-वर्किंग स्पेसचे फायदे

  • खुर्चीनुसार दरमहा पैसे
  • खुर्च्या कमी अथवा जास्त करण्याची लवचिकता
  • सर्व कार्यालयीन सोयीसुविधा मोफत
  • विविध क्षेत्रांतील कार्यालये असल्याने व्यावसायिक सहकार्याचे वातावरण
  • मोफत चहा, कॉफी
  • इंटरनेटच्या सुविधेसह अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली
  • दरमहा ठराविक तास मिटिंग रुमची सुविधा

आणखी वाचा-पिंपरी : हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा तीन महिन्यांपासून धूळखात

स्वतंत्र कार्यालयासाठी भांडवली खर्च करण्यापेक्षा को-वर्किंगमध्ये काम करणे कंपन्यांना सोयीचे वाटते. कार्यालयासाठी आवश्यक असलेल्या दैनंदिन गोष्टींची जबाबदारी आम्ही घेत असल्याने त्यांना त्याच्या मूळ कामावर पूर्णपणे लक्ष देता येते. भविष्यात शहरातील मध्यवर्ती भागातही या सुविधा वाढतील. -नीलेश सुळे, संचालक, सीसी अँड को

कंपन्यांना व्यवसायाव्यतिरिक्त इतर दैनंदिन गोष्टींची चिंता करण्याची आवश्यता को-वर्किंग स्पेसमध्ये राहात नाही. सर्व सुविधा एकाच जागी मिळत असल्याने कंपन्यांच्या कामकाजात सुसूत्रता येते. याचबरोबर को-वर्किंग स्पेसमधील व्यावसायिक वातावरणही पूरक ठरते. -अमित धोंगडे, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, एव्हरीस्पेंड इंडिया (को-वर्किंगमध्ये कार्यरत कंपनी)