पुणे : महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने राजकीय पक्षांकडून शहरात बेकायदा फलकबाजी सुरू झाली असल्याने त्याविरुद्ध कारवाईसाठी महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. वारंवार सूचना देऊनही राजकीय फलकांबरोबरच अन्य बेकायदा फलकांवर कारवाई होत नसल्याने आता थेट महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर याची जबाबदारी देण्यात आली आहे.

महापालिकेतील तीन अतिरिक्त आयुक्त रस्त्यांवर उतरून पाहणी करणार असून, याची सुरुवात सोमवारपासून करण्यात आली. अनधिकृत फलक लावणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक फलकावर छपाई करणाऱ्याचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचेही महापालिकेच्या विचाराधीन आहे.

शहरातील विविध भागांत बेकायदा जाहिरातफलकांचे पेव फुटले असून, त्यावर कारवाई करण्यास महापालिकेचा अतिक्रमण, तसेच आकाशचिन्ह विभाग असमर्थ ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.

बेकायदा फलकांवर कारवाई करताना आकाशचिन्ह विभागातील अधिकारी दुजाभाव करत असून, अर्धवट कारवाई करत असल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राम यांनी त्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेतील तीन अतिरिक्त आयुक्तांकडे विविध भागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामध्ये पृथ्वीराज बी. पी., प्रदीप चंद्रन आणि ओमप्रकाश दिवटे यांचा समावेश आहे.

अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी  बिबवेवाडी भागात लावण्यात आलेले अनधिकृत जाहिरात फलक, राजकीय पक्षांच्या ‘माननीयां’चे फलक यांची पाहणी केली. ते सर्व फलक तातडीने काढून टाकावेत, तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

याबाबत पृथ्वीराज बी. पी. म्हणाले, ‘शहरातील विद्युत खांब, सार्वजनिक दिवे, सिग्नलचे खांब यासह अनेक चौकांमध्ये लाकडी आणि लोखंडी चौकडी उभारून सर्रासपणे फलकबाजी केली जाते. विविध कार्यक्रमांचे आयोजन, वाढदिवस, सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी ही फलकबाजी केली जाते. त्यामुळे शहराच्या विद्रूपीकरणात अधिकच भर पडते. काही ठिकाणी हे फलक धाेकादायक पद्धतीने उभे केले जातात. सार्वजनिक दिव्यांचे खांब, तसेच दुभाजकावर असलेल्या दिव्यांच्या खांबावर लावण्यात आलेले फलक हे धोकादायक पद्धतीने लावलेले असतात. त्यामुळे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’

राजकीय पक्षांचे फलक सर्वाधिक

राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने चौकांमध्ये बेकायदा फलक लावतात. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतात. राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याने महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे ही राजकीय फलकबाजी राेखण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमाेर आहे. महापालिकेने आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यावर, कार्यकर्त्यावर बेकायदा जाहिरातफलक लावला म्हणून दंडात्मक कारवाई केलेली नाही. तसेच गुन्हाही दाखल केलेला नाही.

बेकायदा फलकांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. यासाठी कठोर पावले उचलण्याची तयारी महापालिकेने केली आहे. फलकांची छपाई करणाऱ्या व्यावसायिकांची बैठक घेतली जाणार आहे. प्रत्येक फलकावर संबंधित छपाई करणाऱ्याचे नाव टाकणे बंधनकारक करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे बेकायदा फलक छपाईवर काही प्रमाणात नियंत्रण आणता येईल. – पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका