पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे महापालिकेने स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध भाग स्वच्छ रहावा यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. महापालिका आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नवल किशोर राम यांनी देखील शहर स्वच्छतेचा संकल्प केला आहे.
शहरातील विविध भागात जाऊन तेथील स्वच्छता कशी आहे. याची पाहणी करण्यास आयुक्त राम यांनी सुरुवात केली आहे. कचरा व्यवस्थापनात बदल करून सुधारणा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी कचऱ्यावर प्रक्रिया होणाऱ्या भेट दिली होती. मात्र एवढ्यावर न थांबता आयुक्तांनी आता झोपडपट्यांनाही भेट देऊन तेथील परिस्थिती पाहण्यास सुरुवात केली आहे.
जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीत पाणीपुरवठा, मलनिःसारण, कचरा व्यवस्थापन या समस्या सोडवून आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, असे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले आहे. ‘पाटील इस्टेट’मधील समस्या सोडवून तेथे सुशोभीकरण केले जाणार असल्याचे आयुक्त राम यांना पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पुणे महापालिकेच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. यानिमित्त महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शिवाजीनगर येथील ‘पाटील इस्टेट’ला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी व्यवस्थापन, दैनंदिन स्वच्छता याची आयुक्तांनी सविस्तर माहिती घेतली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. ‘पाटील इस्टेट’ भागात सुमारे ८०० घरे असून, येथे साडेतीन हजार नागरिक राहतात. या भागात असलेल्या उड्डाणपुलाखाली भंगारचे साहित्य, वाहने पडून आहेत. त्यामुळे या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असते.
‘या भागातील नागरिकांना आवश्यक त्या पायाभूत सोयी मिळणे हा त्यांचा अधिकार असून, त्याबाबतच्या सूचना महापालिका आयुक्त राम यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. गुरुवारी दुपारी महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केलेल्या दौऱ्याची माहिती दिली.
आयुक्त राम म्हणाले, ‘पाटील इस्टेट भागातील नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. येथील जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या खूप जुन्या झाल्या आहेत. त्या बदलण्याची गरज आहे. यासाठी मलनि:सारण विभाग व क्षेत्रीय कार्यालयाला निधी उपलब्ध करून दिला जाईल. येथील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी २५ लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून, पुढील आठ दिवसांत काम सुरू होईल. या भागातील स्वच्छता वाढली पाहिजे. अतिरिक्त मनुष्यबळ देऊन या ठिकाणी स्वच्छता केली जाईल.’ या भागातील नागरिकांना विश्वासात घेऊन येथील वाहतूक नियोजन व अन्य गोष्टींमध्ये सुधारणा करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.