पुणे : पीएमपी प्रवाशाच्या पिशवीतून साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एकाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार पिंपळे निलख परिसरात राहायला आहेत. ते पुणे स्टेशन परिसरातून पीएमपी बसने पिंपळे निलखला रविवारी (२५ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास निघाले होते.
बसमध्ये गर्दी होती. चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून साडेचार लाखांचे दागिने चोरून नेले. गणेशखिंड रस्ता परिसरात पिशवीतून दागिने चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करत आहेत.