लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट न दिल्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या नाकावर जोरदार ठोसा लगावला. त्या घटनेत पतीचा मृत्यू झाला. पुण्यातल्या वानवाडी भागात ही घटना घडली आहे. वानवाडी भागात गंगा सॅटेलाइट नावाची उच्चभ्रू सोसायटी आहे. त्या सोसायटीत शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. निखिल पुष्पराज खन्ना (वय-३६ ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी निखिल खन्नाची पत्नी रेणुका खन्नाला अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकी काय घडली घटना?

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका आणि निखिल या दोघांचा २०१७ मध्ये प्रेमविवाह झाला होता. निखिल हे हे पत्नी रेणुका आणि त्यांच्या आई वडिलांसह राहात होते. पतीने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिलं नाही तसंच दुबईला घेऊन गेला नाही या कारणावरुन दोघांचं शुक्रवारी भांडण झालं. दुपारी साडेबाराच्या सुमारास रेणुकाने निखिलच्या नाकावर ठोसा मारला. या घटनेत निखिल यांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झालं आणि बराच रक्तस्राव झाला. या घटनेनंतर रेणुकाचे सासरे आणि निखिल यांचे वडील डॉ. पुष्पराज खन्ना यांनी निखिलला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र निखिलने काही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी रेणुकाला अटक केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुका आणि निखिल यांचं लग्न २०१७ मध्ये झालं होतं. गंगा सॅटेलाईट या उच्चभ्रू सोसायटीत हे दोघं वास्तव्य करत होते. या दोघांचाही प्रेमविवाह होता, मात्र दोघांमध्ये काही कालावधीतच खटके उडू लागले. निखिलच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही रेणुकाला अनेकदा समाजवलं होतं. मात्र तिच्या वागणुकीत काही बदल झाला नाही. अनेकदा ती भांडण करत असे असं पुष्पराज खन्ना यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.

रेणुका तिच्या पतीसह नाखुश होती. तिला लग्नाच्या वाढदिवसाला दुबईला जायचं होतं. ५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. मात्र या दोघांचं भांडण झालं. निखिलने दिलेलं गिफ्ट रेणुकाला आवडलं नाही. यावरुन आणि दुबईला का गेलो नाही? यावरुन त्यांचा वाद झाला. ज्यानंतर रेणुकाने निखिलला ठोसा मारला असं पुष्पराज खन्ना यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune realtor bleeds to death after alleged assault by wife fractures nose scj