विसर्जन मार्गावरील दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. आवाजाने थरकाप उडत आहे. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैभवशाली परंपरा असलेल्या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ प्रथेप्रमाणे  मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा चौकातून झाला. मध्यरात्रीनंतर सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेतील छोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. बांबुचे अडथळे उभे करण्यात आले. विसर्जन मार्गावरुन मानाची मंडळे मार्गस्थ झाल्यानंतर सायंकाळनंतर ध्वनिवर्धकांच्या दणदणाट सुरू झाला. अनेक मंडळांनी ध्वनिवर्धकासह प्रखर प्रकाशझोत सोडले होते. ध्वनिवर्धकांच्या भिंतीसमोर तरुणाई बेधुंद नाचत असल्याचे पाहायला मिळाले.  

हेही वाचा >>> स्तुत्य उपक्रम: गणपती मंडळाच्या लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैशातून नागरिकांना ‘शेकडो’ हेल्मेटच वाटप

बाजीराव रस्तामार्गे कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळाने उच्चक्षमेतेचे ध्वनिवर्धकांचा वापर केला होता.ध्वनिवर्धकांचा दणदणाटामुळे विसर्जन मिरवणुकीतील देखावे पाहणाऱ्या भाविकांना त्रास झाला. ढोल ताशा पथकांचा आवाजाने मर्यादा ओलांडली होती. भाविकांसह स्थानिक रहिवाशांना आवाजाचा त्रास झाला. लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता परिसरात सायंकाळनंतर मोठी गर्दी झाली होती. आकर्षक देखावे प्रकाश योजनेमुळे लक्षवेधी ठरले होते.

दणदणाटामुळे पोलीसही हतबल

विसर्जन मार्गावरील बहुतांश मंडळांनी उच्चक्षमेतेची ध्वनिवर्धक यंत्रणा वापरली होती. ध्वनिवर्धक तसेच ढोल ताशा पथकांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याने पोलीसही हतबल झाले. विसर्जन मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळनंतर विसर्जन मार्गावर गर्दी झाल्याने चालणे देखील अवघड झाले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune recorded high decibel sound during ganesh immersion procession pune print news rbk 25 zws