पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील गैरकारभाराचा आणखी एक नमुना सोमवारी समोर आला. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभार डॉ. यल्लाप्पा जाधव यांनी २० एप्रिलला स्वीकारला. मात्र, आधीचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचा सोमवारी अचानक ताबा घेतला. यामुळे रुग्णालयात खुर्चीनाट्य सुरू होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणावर अधिष्ठात्यांनी बोलण्यास नकार दिला.

ससूनमध्ये मागील काही काळात घडलेल्या गैरप्रकारांमुळे अधिष्ठात्यांना डावलत थेट वैद्यकीय आयुक्त राजीव निवतकर यांनी डॉ. जाधव यांच्या नियुक्तीचा आदेश १९ एप्रिलला काढला होता. त्यानुसार डॉ. जाधव यांनी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना लेखी पत्र देऊन २० एप्रिलला पदभार स्वीकारला. डॉ. जाधव हे सोमवारी सकाळी रुग्णालयाची दैनंदिन पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आधीचे अधीक्षक डॉ. तावरे यांनी अधीक्षक कार्यालयात येऊन खुर्चीचा ताबा घेतला.

हेही वाचा : कसबा पेठेत प्रशासनाची कारवाई, केले ‘इतके’ रुपये जप्त!

काही वेळातच डॉ. जाधव हे कार्यालयात आले असता अधीक्षकपदाच्या खुर्चीवर डॉ. तावरे बसलेले दिसले. याबद्दल त्यांनी विचारणा केली असता अधिष्ठात्यांनी मला पद सोडण्याचे आदेश दिले नाहीत, अशी भूमिका डॉ. तावरे यांनी मांडली. यावर डॉ. जाधव यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांचा आदेश दाखविला. त्यावर दोघांनी अधिष्ठाता जे आदेश देतील त्याचे पालन करूया, असे ठरविले. डॉ. तावरे यांनी अधिष्ठात्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला डॉ. तावरे यांनी पदभार सोडू नये, असा आदेश काढला. त्यानंतर काही वेळाने पुन्हा पहिला आदेश रद्द ठरवत अधिष्ठाता डॉ. तावरेंनी पदभार डॉ. जाधव यांच्याकडे सोपवावा, असा आदेश काढला. यानंतर अखेर डॉ. तावरे यांनी डॉ. जाधव यांच्याकडे अधिकृतरीत्या पदभार सोपविला.

खुर्चीनाट्याचा घटनाक्रम

१९ एप्रिल

  • वैद्यकीय शिक्षण आयुक्तांकडून डॉ. यल्लाप्पा जाधव यांची अधीक्षकपदी नियुक्ती करण्याचा आदेश

२० एप्रिल

  • डॉ. यल्लाप्पा जाधव यांनी अधिष्ठात्यांना लेखी पत्र देऊन अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला

हेही वाचा : पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…

२१ एप्रिल

  • डॉ. अजय तावरे यांचा सकाळी अधीक्षकपद सोडले नसल्याचा दावा
  • अधिष्ठात्यांकडून डॉ. तावरे यांना दुपारी पदभार न सोडण्याचा आदेश
  • अधिष्ठात्यांकडून दुपारीच आधीचा आदेश रद्द करून पुन्हा पदभार सोडण्याचा डॉ. तावरेंना आदेश