अपूर्वा जोशी

२०१५ सालातली गोष्ट असेल, मी तेव्हा अनेक कंपन्यांसाठी जोखीम व्यवस्थापनाचे काम करत असे. कॉर्पोरेट जग मला नुकतेच खुणावू लागलेले, कॉर्पोरेट जगतात काहीतरी मोठं करायचं, असं माझं मन मला सांगत होते. नुकताच कंपनी कायदा बदलला होता आणि नोंदणीकृत कंपनीच्या संचालक मंडळावर एक स्वतंत्र महिला संचालक हवी, अशी तरतूद बदललेल्या कायद्यात होती. क्विकहिल त्या वेळेस आयपीओ आणायचा विचार करत होती. आणि अशातच एक दिवस क्विक हिल कंपनीच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक म्हणून येणार का, अशी विचारणा झाली. तसे मी लहानपणापासून या कंपनीबद्दल रेडिओवर ऐकत आली होती. आपके पीसी में कौन रहता है, क्विकहिल या व्हायरस, ही जाहिरात सर्वश्रुत होती. पण तरीही मला काटकर बंधूबद्दल कुतूहल होते. मुळात क्विक हिल हे काही काटकर बंधूंच्या कंपनीचं नाव नव्हतं, ते त्यांच्या व्हायरस सॉफ्टवेयर प्रॉडक्टच नाव होतं.

१९९३ पर्यंत कॅल्क्युलेटरच्या व्यवसायात असलेल्या काटकर बंधूंनी त्या व्यवसायाला अलविदा करून संगणकाच्या देखभालीचा नवीन व्यवसाय चालू केला. तेव्हा कैलाशने या व्यवसायाचं नाव कॅट कम्प्युटर्स अस ठेवलं होतं, पण १९९७-९८ सालात जेव्हा देखभालीचा धंदा बंद करून फक्त अँटी व्हायरस विकायचं ठरलं तेव्हा कैलाशला कंपनीचे नाव संस्कृत ठेवायचं होत पण संजयची महत्वाकांक्षा विश्वव्यापी होती. त्याला आता आपलं सॉफ्टवेयर जगभरात पोचवायची चिन्ह दिसू लागलेली म्हणून आज्ञाधारक असून पण संजयने या वेळेस दादाच्या निर्णयाला थोडासा विरोध केला. पण एकमेकांवर या दोन्ही भावांचा अतूट विश्वास होता. कालांतराने जेव्हा मी त्यांच्या संचालक मंडळाचा भाग झाले तेव्हा मला त्यांचे काम जवळून पाहायची संधी मिळाली.

हेही वाचा… वर्धापनदिन विशेष : प्रयोगकलांसाठी कटिबद्ध ‘डॉ. अशोक दा. रानडे अर्काइव्हज’

इस्लामपूरवरून आलेले सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन भाऊ ते सायबर सुरक्षा क्षेत्रातील पहिल्या भारतीय नोंदणीकृत कंपनीचे मालक हा त्यांचा प्रवास पाहताना असे जाणवते की दुर्दम्य इच्छाशक्तीला जेव्हा परस्पर विश्वासाची साथ मिळते तेव्हा यश हमखास गवसणी घालते. त्यांचा हा प्रवास आजच्या सामान्य मराठी मध्यमवर्गीय युवकांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. या प्रवासाला त्याग, विश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती अशा मराठी मध्यमवर्गातील मूल्यांची किनार लाभली आहे. पुण्यात आल्यावर कैलाश काटकर संगणक दुरुस्तीचे काम करत असत आणि ते काम करत असताना त्यांनी आपल्या व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. ज्याचा फायदा त्यांना क्विकहिल कंपनीचे भागीदारांचे जाळे विणताना झाला. आजमितीला २५ हजारांच्या घरात क्विकहिलचे भागीदार त्यांचे प्रॉडक्ट वितरित करताना दिसतात. भारताच्या सॉफ्टवेयर क्षेत्राचा विचार केला तर भारतीयत्व जपून जगाच्या नकाशावर स्वतःचा ठसा उमटवलेल्या प्रॉडक्ट कंपन्या तश्या कमीच आहेत आणि क्विक हिलचे नाव त्यात अग्रक्रमाने येते.

या भागीदारांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता, बहुतेक सगळ्या भागीदारांना काटकर बंधू नावाने ओळखतात. म्हणूनच असेल कदाचित त्यांनी अमेझॉन आणि फ्लिपकार्ट आदी ई कॉमर्स कंपन्यांना फैलावर घेतलेले होते. अमेझॉनवर प्रॉडक्ट मिळायला लागल्यावर आपल्या जुन्या भागीदारांचे नुकसान होऊ नये ही त्यामागे त्यांची भूमिका होती. पण कालांतराने विक्री वाढवण्याच्या रेट्यामुळे, गुंतवणूकदारांच्या दबावासमोर त्यांना अमेझॉनवर आपले प्रॉडक्ट उपलब्ध करूनच द्यावे लागले. पण ते करताना देखील त्यांनी आपल्या भागीदारांना विश्वासात घेऊन आपली व्यथा मांडली होती. संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्या भागीदारांसाठी भावनिक होणारा प्रवर्तक मी पहिल्यांदा पाहिला होता.

हेही वाचा… वर्धापनदिन विशेष : वाहन निर्मितीतील नावीन्याचा ध्यास

म्हणूनच भारतात आज सगळ्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या सायबर सुरक्षेच्या प्रणालींचा व्यवसाय करीत असल्या तरी क्विकहिलच किरकोळ क्षेत्रातील सायबर सुरक्षेच्या बाजारातला दादा आहे. पण त्यांच्या दादागिरीला आवाहन उभे राहिले जेव्हा मायक्रोसाॅफ्ट आणि एपल या दिग्गज कंपन्यांनी क्विक हिल विरोधात दंड थोपटले. या कंपन्यांनी जेव्हा अँटी व्हायरस हे जेव्हा त्यांच्या विंडोज किंवा फोन मधेच विनामूल्य द्यायला सुरुवात केली तेव्हा मात्र कंपनीसमोर काही काळ अस्तित्वाचेच आवाहन उभे राहिले होते. फुकट मिळणाऱ्या गोष्टीसाठी कोण पैसे खर्च करणार होते ? ही ग्राहकाची मानसिकता होती.

भारतीय सॉफ्टवेयरची ताकद जगाला दाखवून देण्याची वेळ आली होती. कंपनीने जागतिक झेप घेत असताना सुद्धा त्यांचे भारतीयत्व जपले होते. कंपनीचे नाव जागतिक हवं होतं. पण भारतीय समाजाचे संगणकीय आणि तांत्रिक प्रश्न सोडवणे यातच त्यांचा हातखंडा होता. भारतातल्या संगणकावर कधी ना कधी प्रकट झालेल्या प्रत्येक विषाणूचा संग्रह त्यांच्याकडे बनलेला. भारतातील लाखो लॅपटॉप, संगणक, मोबाईल फोन्स आणि त्यावर प्रकटणारे विषाणू याचा अभ्यास कंपनीने चालू केला, हा अभ्यास चालू असताना त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. भांडवल बाजारात समभागांच्या किमतीत घसरण झाली. पण दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आपल्या कर्मचाऱ्यांवरचा विश्वास यामुळे त्यांनी अभ्यास चालू ठेवला आणि यातून नावीन्यपूर्ण उत्पादने त्यांनी बाजारात आणायला सुरुवात केली आणि याचीच दखल आज भारतातल्या अनेक कंपन्यांनी घेऊन परदेशी अँटी व्हायरसला हद्दपार करायला सुरुवात केली. जियो संगणक असेल किंवा टाटासोबतची भागीदारी असेल ही उदाहरणे प्रचंड बोलकी आहेत. चंद्रयान-३ या आपल्या देशासाठी महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या उपक्रमाची संपूर्ण सायबर सुरक्षा क्विक हिलद्वारे केली गेली होती. या खेरीज आज देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे अनेक प्रकल्प क्विक हिल राबवत आहे. विक्रीचे नवीन नवीन उच्चांक गाठत असताना क्विक हिल बद्दल एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. या यशस्वी माणसांमागे दोन सामाजिक भान जपणारी माणसे आहेत. देशात जर डिजिटायझेशन होणार असेल तर पुढच्या पिढ्यांना सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असे काटकर बंधू मानतात. दरवर्षी शाळा, कॉलेजेसमध्ये जाऊन, विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण देऊन, त्यांना पुढे इतर शाळा, कॉलेजेसमध्ये जाऊन शिकवायची संधी क्विक हिलद्वारे उपलब्ध केली जाते. याद्वारे सायबर सुरक्षित नवीन पिढीची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. सायबर सुशिक्षित तरुणांची फौज जर तयार झाली तर आपला देश कोणत्याही आव्हानांचा समर्थपणे सामना करू शकतो. पण हे सर्व करत असताना काटकरांनी कंपनीमध्ये मराठीपण जपले आहे, हे मात्र कौतुकास्पद आहे.