पुणे : शहरासह डोंगरमाथ्यावर आणि धरणांच्या परिक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. शनिवारी दुपारपासून पावसाची संततधार सुरू असल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात २,९६८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पावसाचा जोर वाढल्यास नदीकाठच्या नागरिकांनी सावध रहावे, असा इशारा जलसपंदा विभागाने दिला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये पाणीसाठा २९.०७ अब्ज घनफूट (टीएमसी) जमा झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली असताना शनिवारी पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे सायंकाळी पाच वाजता धरणातून १,६८८ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.
मात्र, सायंकाळनंतरही पावसाची संततधार सुरू असल्याने सात वाजेनंतर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढवून २,९६८ क्युसेक करण्यात आला. धरण साखळीतील वरसगाव धरणक्षेत्रात ३ मिलिमीटर, टेमघर धरणक्षेत्रात २ मि.मी, तर खडकवासला आणि पानशेत धरणक्षेत्रात प्रत्येकी एक मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.