पुणे : गुडघ्यांची झीज झाल्याने ज्येष्ठ महिलेला गेल्या काही महिन्यांपासून त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यात आणखी वाढ होऊन चालणेही अवघड बनले. ससून सर्वोपचार रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागातील डॉक्टरांनी या महिलेवर रोबोच्या मदतीने गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आहे. रोबोटिक प्रक्रियेमुळे अधिक अचूक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून, ही महिला लवकर बरी होण्यास मदत होणार आहे.

मोहोळ येथील ६२ वर्षीय महिलेवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिलेच्या दोन्ही गुडघ्यांची झीज झाल्याने तिला चालताना अडचणी येत होत्या. गुडघ्यात वेदना होत असल्याने त्या चालताना लंगडत होत्या. गेल्या चार महिन्यांपासून हे दुखणे आणखी वाढले. तिला घरातही चालणे अशक्य बनले. ही महिला सध्या पुण्यातच स्थायिक झाली आहे. त्यामुळे तिने ससून सर्वोपचार रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचार विभागातील डॉक्टरांना दाखविले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना गुडघा प्रत्यारोपणाचा सल्ला दिला. याचबरोबर रोबोटिक प्रक्रियेने ही शस्त्रक्रिया करण्यासही सांगितले.

या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिच्या पायाची सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली. संगणकीय कार्यक्रमाच्या आधारे या तपासणीतील प्रतिमेचे त्रिमितीय चित्र तयार करण्यात आले. त्यानुसार, पायामध्ये बसविण्यासाठी कृत्रिम सांध्यांची मापे ठरवली गेली. त्यानंतर रोबोटिक प्रक्रियेत हे सर्व तपशील समाविष्ट करण्यात आले. प्रत्यक्ष शस्त्रक्रियेवेळी रोबोटिक प्रक्रियेत पायाच्या हाडांमध्ये रोबोटिक ट्रेकर्स बसविण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी पायावर छेद देण्यात आला. त्यातून गुडघ्यातील सांधा काढून त्या जागी कृत्रिम सांधा बसविण्यात आला. ससूनचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि अस्थिव्यंगोपचार विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

रोबोटिक प्रक्रियेची वैशिष्ट्ये

– रोबोटिक प्रक्रियेसाठीची यंत्रे खूप महागडी असल्याने नेहमीच्या शस्त्रक्रियेपेक्षा महाग ठरते.

– दोन ते तीन शस्त्रक्रियांनंतर घासणी व ट्रेकर हे डिस्पोजीबल भाग बदलावे लागतात.

– रोबोटिक प्रक्रिया सर्व रुग्णांना न वापरता केवळ गुंतागुंतीच्या रुग्णांनाच वापरणे व्यवहार्य ठरते.

– दोन-तीन रोबो तंत्रज्ञ शस्त्रक्रियेवेळी उपस्थित असावे लागतात.

– आधीच्या नियोजनाचा वेळ लक्षात घेता शस्त्रक्रियेला लागणारा वेळ सुमारे दीडपट असतो.

– रुग्णाच्या शरीरावर अधिक अचूकपणे छेद देता येत असल्याने लवकर बरे होण्यास मदत होते.