आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या वळणांना सामोरे जाताना, आपल्या कुटुंबाला मानसिक, भावनिक, आर्थिक आधार देत वाटचाल करीत असताना उपलब्ध वेळेचे सुयोग्य नियोजन व्हावे, असे काही महिलांना वाटले आणि त्यातून उदयास आला ‘संवादिनी’ गट. हा गट नुसताच उदयाला आला असे नाही तर ‘स्वयंविकासातून समाज परिवर्तन’ हे ध्येय मनाशी धरून त्यांनी सुरू केलेल्या या गटाला दोन तपांच्या कार्याचे सोनेरी कोंदण लाभले. यासाठी अर्थातच ‘अनंत आमुची ध्येयासक्ती’ या ब्रीदाचा त्यांनी सन्मान केला आणि त्यासाठी सुयोग्य प्रयत्नदेखील केले. अनेक महिलांना समविचारी मैत्रिंणींसोबत काही काम करावे असे वाटले आणि त्यांनी स्वत:ला या ‘संवादिनी’च्या कार्यात सामावून घेतले. यामुळे एक खूप महत्त्वाची गोष्ट झाली आणि ती म्हणजे त्यांच्या स्वतःच्या क्षमतांची ओळख होण्याबरोबरच स्वत:ची ओळख झाल्यामुळे त्यांची स्वप्रतिमा उजळून निघाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उद्याच्या पिढीच्या सक्षमीकरणात महत्त्वाचा वाटा उचलणारा हा गट पंचविसाव्या वर्षात पदार्पण करत आहे ही विशेष बाब आहे. ‘वेळ नाही’ ही सबब बाजूला ठेवत उपलब्ध वेळ सत्कारणी लावत सुरू असलेल्या त्यांच्या या कार्यामुळे स्वविकासाबरोबरच समाज विकासातही त्या महत्त्वाचे योगदान देत आहेत. संवादिनीची उद्दिष्टे म्हणजे महिलांमधील आत्मभान (स्व जाणीव) आणि आत्मसन्मानाची (स्व आदर) भावना बळकट करण्यासाठी संवादिनीचे हे व्यासपीठ वापरले जाते. त्याबरोबर त्यांच्या संघटन कौशल्याचाही उपयोग या माध्यमातून आपोआपच होतो. या गटाच्या संपर्कात येणाऱ्या महिलांचे संघटन करणे, समाजातील कुटुंब जीवनाच्या गुणवत्तेचा अभ्यास करून ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, विविध वयोगटांतील स्वयंसेवी वृत्तीच्या व्यक्तींची ‘कार्यकर्ता घडण ते नेतृत्व घडण’ ही प्रक्रिया अधिक समृद्ध करणे, महिलांच्या ‘मानसिक आरोग्य संवर्धनासाठी’ प्रयत्नशील राहणे, प्रबोधनात्मक तसेच कौशल्य विकासाच्या उपक्रमांची मांडणी आणि उपाययोजन करणे आदी उद्दिष्टांच्या सहाय्याने या गटाचे कार्य चालते.

हेही वाचा – अंकुश चिंतामण, हेमंत पाटील यांना, केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक

सामाजिक हितासाठी स्वतःचा वेळ देऊ इच्छिणाऱ्या स्त्रियांचे एकत्रीकरण (गट बांधणी) हा हेतू मनात ठेवून संवादिनीची सुरुवात २००० साली करण्यात आली. या संवादिनीच्या माध्यमातून विविध उपक्रम चालतात. त्या उपक्रमांमध्ये ‘उमलत्या वयाशी जुळवून घेताना’ या उपक्रमांतर्गत वयात येणाऱ्या मुला-मुलींसाठी लैंगिकता प्रशिक्षण, ‘बहर जोपासताना’ या उपक्रमाद्वारे पालकांसाठी कार्यशाळा, ‘तरुणाईची आव्हाने’ या उपक्रमाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘जीवन कौशल्य’ कार्यशाळा, तर सहजीवनाच्या उंबरठ्यावर उपक्रमाअंतर्गत तरुणांसाठी ‘विवाहपूर्व मार्गदर्शन’ही करण्यात येते. इयत्ता पहिली ते सातवीच्या वयोगटासाठी लैंगिक शोषण विरोधी जाणीव जागृती कार्यशाळा म्हणजे ‘ओळख स्पर्शाची’ या उपक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकसनाला चालना देणारा ‘विद्याव्रत संस्कार’ देखील या गटामार्फत केला जातो.

हेही वाचा – पार्किंगच्या वादातून निवृत्त लष्करी जवानाकडून एकावर गोळीबार; टेम्पो चालकाचा मृत्यू, येरवड्यातील घटना

या शिवाय वंचित गटातील मुलांना शिक्षणपूरक कृतीतून मार्गदर्शन करणारा ‘पालवी’ उपक्रम, दहा ते तेरा या वयोगटातील मुलामुलींसाठी ‘स्व-भान व सामाजिक भान’ मार्गदर्शन कार्यशाळा, बारा ते सोळा वयोगटातील विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य मार्गदर्शन करणारा कौशल्य गट, समृद्धी आणि समानतेने युक्त अशा संतुलित समाजासाठी चिंतनशील आणि वैचारिक लेखन असणारे ‘समतोल’ हे द्वैमासिक असे विविध उपक्रम या गटामार्फत सातत्याने सुरू आहेत. ‘संवादिनी’चे उपक्रम पुण्यातील सदाशिव पेठेतील ज्ञान प्रबोधिनी शाळा, पौड रस्ता, औंध, शिरूर, राजगुरुनगर, बोरिवली, सोलापूर, ठाणे, डोंबिवली, भाईंदर आदी ठिकाणीही चालतात. या उपक्रमात सहभागी असणाऱ्या सदस्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी समूहगुण कार्यदिशेच्या मदतीने प्रशिक्षणाचेदेखील आयोजन केले जाते. या गटामार्फत २०२२-२३ मध्ये ‘जेंडर सेन्सिटायझेनशन’ या विषयावर पोलिसांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली होती. विविध वयोगटातील आणि विविध आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरांवरून एकत्र आलेल्या या भगिनींचे कार्य पाहिले की स्त्रीशक्ती काय असते याची जाणीव सहजतेने होऊ शकते. सामाजिक भान जागृत ठेवत एकत्र आलेल्या सगळ्या जणींचे कार्य म्हणजे उद्याची पिढी सक्षम व्हावी म्हणून कार्यरत असणारे शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्यतः पालक या सर्वांना सहाय्यकारी असे संवादाचे एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samvadini group and social transformation and debut in twenty fift year print politics news sso 25 ssb