पुण्यातील खडकवासला धरण परिसरात ९ मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी ७ मुली पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती. त्यापैकी पाच मुलींना वाचविण्यात यश आले. तर दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर या घटनेच्यावेळी गोऱ्हे खुर्द येथील ५३ वर्षीय संजय सीताराम माताळे यांनी पाच मुलींचा जीव वाचवण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या घटनेबाबत संजय सीताराम माताळे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमीत सावडण्याचा विधी सुरू होता. त्यावेळी अचानक काही मुलींचा आरडाओरड ऐकण्यास मिळाला. त्यानंतर आम्ही सर्वजण धरणाच्या भिंतीजवळ गेल्यावर मुली बुडत असल्याचे दिसले. त्यावर मी धावत जाऊन पाण्यात उडी मारली. तोपर्यंत मुलींच्या नाका तोंडामध्ये पाणी गेल्याने बेशुद्ध पडल्या होत्या. त्यामुळे बाहेर काढणं कठीण झाले होते. पण एक एक करून पाच मुलींना बाहेर आणल्यावर, त्या सर्व मुलींना तात्काळ रूग्णालयात दाखल केले. पण दोन मुलींचा जीव वाचवू शकलो नाही. या गोष्टीची खंत कायम राहील अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.