पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचा वेगाने होणारा विस्तार लक्षात घेता सर्वसमावेशक विकास अत्यावश्यक आहे. यासाठी निधीसह सामाजिक दायित्व (सीएसआर) क्षेत्रातील कंपन्यांचा अनुभव, कौशल्य आणि मनुष्यबळाचाही सहभाग आवश्यक आहे. शहरातील प्रकल्पांसाठी सामाजिक दायित्व निधीचा आधार असल्याचे महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
शहरातील नागरी सुविधा आणि लोककल्याणात्मक विकासासाठी ‘सीएसआर’अंतर्गत दीर्घकालीन भागीदारी सशक्त करण्याच्या उद्देशाने चिंचवड येथे विशेष बैठक पार पडली. या बैठकीत पन्नासहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्या वेळी आयुक्त सिंह बोलत होते.
शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि पर्यावरण या मूलभूत क्षेत्रांतील नागरिकाभिमुख पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित करून सिंह म्हणाले, ‘मोरवाडीतील दिव्यांग भवन, लाइटहाउस कौशल्य विकास उपक्रम, भोसरीतील शिवणकला केंद्र, मोशीतील शास्त्रशुद्ध घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आदींमध्ये सीएसआर निधीचे योगदान आहे. सीएसआर निधीचा वापर करून महापालिकेच्या शहरी विकासाच्या प्राधान्यक्रमाशी संलग्न राहून उभारलेले हे प्रकल्प समाजाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात.’
विविध कंपन्यांच्या सीएसआर प्रतिनिधींनी त्यांच्या चालू व नियोजित प्रकल्पांची सादरीकरणे केली. सीएसआर सल्लागार विजय वावरे आणि श्रुतिका मुंगी यांनी सीएसआरद्वारे साध्य झालेल्या विकासकामांचा आढावा सादर केला.