पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील सहा अनधिकृत इंग्रजी शाळांची यादी जाहीर केली असून, या शाळांत प्रवेश न घेण्याचे आवाहन पालकांना केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शहरातील अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनधिकृत आढळल्या. शिक्षण विभागाने आवाहन केल्यानंतरही या शाळांनी मान्यता घेतली नाही. त्यामुळे या शाळांना अनधिकृत ठरविण्यात आले आहे.
‘या सहा शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेऊ नये. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणाऱ्या नुकसानीस पालक स्वतः जबाबदार राहतील. याबाबत शाळेच्या बाहेर आम्ही फलक लावणार आहाेत. शाळांची यादी पुढील कारवाईसाठी जिल्हा परिषदेकडे देण्यात आली आहे,’ असे शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त तानाजी नरळे यांनी सांगितले.