पुणे : भरधाव दुचाकी विद्युत खांबावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागातील जांभुळवाडी रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीस्वार दत्ता कल्याण चोरमले (रा. जांभुळवाडी, आंबेगाव), सहप्रवासी श्रीकांत गुरव अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई प्रकाश शिंदे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार चोरमले हे मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास जांभुळवाडी रस्त्याने भरधाव वेगात निघाले होते. त्यांच्याबरोबर मित्र श्रीकांत गुरव होता. गाथा स्विमिंग पूलजवळ दुचाकीस्वार चोरमले यांचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी विद्युत खांबावर आदळली. अपघातात दुचाकीस्वार चोरमले आणि सहप्रवासी गुरव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चोमरले आणि गुरव यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान दोघांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे तपास करत आहेत. भरधाव वेगामुळे अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

कात्रज डेअरीसमोर सोमवारी दुपारी रूग्णवाहिकेच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. गेल्या दोन दिवसात कात्रज परिसरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

सोलापूर रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर भागात घडली. अशोक तुकाराम शिंदे (वय २६, रा. साळोबा वस्ती, यवत, ता. दौंड, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत दुचाकीस्वार अशोक यांचे वडील तुकाराम सखाराम शिंदे (वय ४९) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तुकाराम आणि त्यांची पत्नी जखमी झाले. दुचाकीस्वार अशोक, त्यांचे वडील तुकाराम आणि आई पुणे-सोलापूर रस्त्यावरून निघाले होते. २१ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातील राजलक्ष्मी लाॅनसमोर भरधाव वाहनाने दुचाकीस्वार अशोक यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता वाहनचालक पसार झाला. अपघातात अशोक यांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील तुकाराम आणि आई जखमी झाले. पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Speeding two killed as speeding two wheeler hits electricity pole in katraj area pune print news rbk 25 zws