पुणे : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या (आयआयआटी पुणे) प्रवेश संख्येत वाढ करण्यात येणार आहे. पुढील वर्षी शैक्षणिक वर्षात १५ टक्के जागांची भर पडणार असून, टप्प्याटप्प्याने पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी. अभ्यासक्रमांची एकूण विद्यार्थिसंख्या अडीच हजारांपर्यंत वाढवली जाणार आहे.

संस्थेचे संचालक डॉ. ओमप्रकाश काकडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संस्थेचे कुलसचिव डॉ. मुकेश नंदनवार, प्रा. चंंद्रकांत गुलेड, प्रा. संजीव शर्मा, प्रा. सुशांत कुमार या वेळी उपस्थित होते. आयआयआटी पुणे ही सार्वजनिक खासगी तत्त्वावरील अभियांत्रिकी शिक्षण संस्था २०१६ मध्ये स्थापन झाली. जेईईच्या माध्यमातून या संस्थेत राष्ट्रीय स्तरावरून प्रवेश प्रक्रिया होते. २०२० मध्ये झालेल्या करोना विषाणू प्रादुर्भावामुळे संस्थेचा पदवी प्रदान कार्यक्रम झाला नव्हता. या पार्श्वभूमीवर पहिला पदवी प्रदान कार्यक्रम शनिवारी (२३ मार्च) काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) कार्यकारी अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात पदव्युत्तर पदवीच्या आठ विद्यार्थ्यांना, तर पदवीच्या आठ विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाणार आहे.

हेही वाचा – ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

काकडे म्हणाले, की राष्ट्रीय महत्त्वाची संस्था दर्जा असलेल्या संस्थेतून आतापर्यंत चार तुकड्या उत्तीर्ण झाल्या आहेत. जेईईच्या माध्यमातून संस्थेत देशभरातील विद्यार्थी प्रवेश घेतात. पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशक्षमतेत १५ टक्के वाढ करण्यात येईल. त्याचप्रमाणे पदव्युत्तर आणि पीएच.डी.च्या जागाही वाढवण्याचे नियोजन आहे. संस्थेत अद्ययावत तंत्रज्ञानावर संशोधन सुरू आहे, तर काही संशोधनासाठीचे एकस्व अधिकार (पेटंट) मिळवण्यात आले आहेत.

हेही वाचा – अनंतराव थोपटेंचा ‘हात’ सर्वांनाच का हवाहवासा?

हेही वाचा – न्याययात्रेतून निष्ठावंतांना न्याय का नाही? काँग्रेसची अंतर्गत नाराजी उघड

तळेगाव येथील संकुलाचे काम प्रगतिपथावर

गेली आठ वर्षे संस्थेचे कामकाज भाडेतत्त्वावर सुरू आहे. मात्र तळेगाव येथील शैक्षणिक संकुलाचे बांधकाम ५० टक्क्यांहून अधिक झाले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून स्वत:च्या नव्या संकुलात संस्था कार्यान्वित होणार आहे, असेही काकडे यांनी सांगितले.