पुणे : मोठी माणसे किती साधी असतात याचा अनुभव देणारी तीन रँग्लरची कथा दस्तुरखुद्द डाॅ. जयंत नारळीकर यांनी दोन वर्षांपूर्वी सांगितली होती. राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर आणि डाॅ. सदानंद बोरसे हे त्यांनी सांगितलेल्या या कथेचे पहिले श्रोते ठरले.

नारळीकर यांच्याविषयी बोलताना माजगावकर यांनी या आठवणीला उजाळा दिला. दोन वर्षांपूर्वी आम्ही त्यांना भेटायला ‘आयुका’मध्ये गेलो होतो. आजारी असलेले नारळीकर व्हीलचेअरवर होते. तेव्हा ‘वेळ कसा घालवता,’ असे मी त्यांना विचारले. ‘लहानपणीच्या आठवणी इंग्रजीतून लिहीत आहे. त्या ‘ब्लाॅग’वर ठेवण्यात येतील. कदाचित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल,’ असे नारळीकर यांनी सांगितले होते. त्याच वेळी नारळीकर यांनी त्यांच्या बालपणीची गोष्ट सांगितली.

ती गोष्ट अशी…, ‘रँग्लर असलेले नारळीकर यांचे वडील विष्णू नारळीकर यांना देशातील पहिले रँग्लर र. पु. परांजपे यांच्याविषयी प्रेम आणि आदर होता. परांजपे यांनी बनारस विद्यापीठाला भेट द्यावी, अशी नारळीकर यांच्या वडिलांची इच्छा होती. एकदाचा हा योग जुळून आला. त्या वेळी नारळीकर तीन-चार वर्षांचे होते. दाेन-तीन दिवस मुक्काम झाल्यानंतर पुण्याला परतण्यासाठी परांजपे निघाले, तेव्हा विष्णू नारळीकर, नारळीकर यांची आई आणि त्यांच्या कडेवर जयंत रेल्वे स्थानकावर आले होते.

‘गाडी केव्हा येणार, असे मी स्टेशन मास्तरला विचारतो,’ असे सांगून नारळीकर यांचे वडील चौकशी करण्यासाठी गेले. त्या वेळी नारळीकर यांच्या आईला र. पु. परांजपे यांच्याशी बोलावे असे वाटले. ‘तुमच्याबरोबर छायाचित्र घेऊ का,’ असे त्यांनी दबकतच विचारल्यानंतर परांजपे यांनी आनंदाने संमती दिली.

कोणाच्या तरी मदतीने नारळीकर यांच्या आईने छोट्या जयंतला कडेवर घेऊन ते छायाचित्र टिपून घेतले. नारळीकर यांच्या वडिलांनी रोल धुवून घेतला तेव्हा त्यांनी या छायाचित्राविषयी नारळीकरांच्या आईला विचारले. त्या वेळी, ‘जयंतानेही रँग्लर व्हावे अशी माझी इच्छा असल्याने रँग्लर परांजपे यांच्याबरोबर त्याचे छायाचित्र घ्यावे असे वाटले,’ असे त्या माउलीने सांगितले.

या घटनेनंतर २५ वर्षांनी जयंत नारळीकर रँग्लर झाले. त्यानंतर नारळीकर आईसमवेत पुण्याला त्यांचे मामा, गणिताचे प्राध्यापक हुजूरबाजार यांच्याकडे आले होते. आता आपण पुन्हा एकदा रँग्लर परांजपे यांच्यासमवेत जयंतचे छायाचित्र घ्यावे, असे वाटल्याने नारळीकर यांच्या आईने परांजपे यांना दूरध्वनी केला. त्या वेळी, ‘नेहमी येतो तसा धोतर-कोटामध्ये येऊ, की रँग्लरच्या पेहरावात,’ असे परांजपे यांनी त्यांना विचारले. रँग्लरच्या पेहरावात आलेले परांजपे यांच्यासमवेत जयंत नारळीकर यांचे छायाचित्र टिपण्यात आले.’ जयंत नारळीकरांच्या या स्मृतींना दिलीप माजगावकर यांनी उजाळा दिला आणि नारळीकरांची ही शास्त्रज्ञापलीकडे असलेली अप्रकाशित बाजू प्रकाशमान केली.