पुणे : लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कोरेगाव पार्क भागातील मतमोजणी केंद्र परिसरात मंगळवार पहाटे सहा वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.

बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी कोरेगाव पार्क येथील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात होणार आहे. मतमोजणी केंद्र परिसरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या भागात बॉम्बशोधक आणि नाशक पथक तैनात करण्यात येणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. कोरेगाव पार्क भागातील मतमोजणी केंद्रात येणाऱ्या प्रतिनिधींसाठी वाहन लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोरेगाव पार्क भागातील पूज्य कस्तुरबा गांधी शाळेच्या आवारात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी वाहन लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोही व्हिला लॉन, दी पूना स्कूल ॲण्ड होम फॉर द ब्लाइंड ट्रस्टच्या आवारात वाहन लावण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रासह शहराच्या वेगवेगळ्या भागांत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चार उपायुक्त, सहा सहायक आयुक्त, १५० वरिष्ठ पोलीस निरीक्षक, १७० उपनिरीक्षक, १२०० पोलीस कर्मचारी, तसेच वाहतूक शाखेतील ७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तास तैनात राहणार आहेत.

हेही वाचा – पुणे : सायकल मार्ग ‘पंक्चर’; अतिक्रमणे, पायाभूत सुविधांअभावी मार्गांचा वापर नाही

निकालाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध पक्षांची कार्यालये, उमेदवारांचे निवासस्थान, कार्यालय परिसरात बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदाेबस्ताची आखणी केली. मतमोजणी केंद्र परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

हेही वाचा – ससूनच्या प्रशासनाला उशिरा जाग! आता डॉक्टरांना आरोपींची तपासणी करण्याचे प्रशिक्षण मिळणार

जिल्ह्यातील बंदोबस्तात वाढ

शिरूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी रांजणगाव येथे होणार आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन अतिरिक्त पाेलीस अधीक्षक, नऊ उपविभागीय अधिकारी, ३८ पोलीस निरीक्षक, १७९ पोलीस उपनिरीक्षक, २८०० पोलीस कर्मचारी, शीघ्र कृती दलाची आठ पथके, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, गृहरक्षक दलाचे ५०० जवान बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.