पुणे : सणासुदीत साखर महाग झाली असून, साखरेच्या दरात किलोमागे पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने कारखानदारांकडून साखरेच्या दरात वाढ केली असल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात साखरेचे भाव कडाडले आहेत. तसेच केंद्र सरकाराने साखरेचा मासिक कोटा कमी केल्याने दरवाढ झाली असल्याने नागरिकांना दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे.

श्रावण महिना, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळीत साखरेला उच्चांकी मागणी असते. खाद्यपदार्थ, मिठाई विक्रेते, घरगुती ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर साखर खरेदी केली जाते. घाऊक बाजारात साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर किरकोळ बाजारात किलोमागे पाच ते सहा रुपयांनी वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी साखरेचे दर ३९ ते ४० रुपये किलो होते. जानेवारी महिन्यापासून साखरेच्या दरात टप्याटप्याने वाढ झाली. क्विंटलमागे सुमारे ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढ होत गेली. घाऊक बाजारात एक क्विंटल साखरेचे दर ३९९० रुपयांवरून ४३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

साखर कारखानदारांनी उत्पादन खर्च, तसेच ऊस खरेदीचा दर वाढल्याने दरवाढ केली आहे. सरकारने साखरेचा मासिक विक्री कोटा कमी केल्याने बाजारात साखरेचा तुटवडा जणवत आहे, अशी माहिती घाऊक बाजारातील साखर व्यापाऱ्यांनी दिली.

साखर दरवाढ

महिना दर (क्विंटलमध्ये)

मे ४०५०

जून ४१५०

जुलै ४२००

ऑगस्ट ४३००

सणासुदीच्या काळात साखरेच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत साखरेचा पुरवठा कमी प्रमाणावर होत आहे. दिवाळीपर्यंत साखरेचे दर तेजीत राहणार आहेत. – ईश्वर नहार, सचिव, दी पूना मर्चंट चेंबर, मार्केट यार्ड

गेल्या वर्षी केंद्र सरकारने ऑगस्ट महिन्यात २५ लाख टन साखरेचा कोटा मंजूर केला होता. यंदा ऑगस्ट महिन्यात साडेबावीस लाख टन कोटा मंजूर करण्यात आला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने घाऊक बाजारात क्विटंलमागे १०० ते १५० रुपयांनी वाढ झाली आहे. गणेशाेत्सवात साखरेच्या दरात आणकी वाढ होण्याची शक्यता आहे. – विजय गुजराती, साखर व्यापारी, भुसार बाजार, भवानी पेठ