पुणे : मागील पाच वर्षांमध्ये साखरेचा बाजार भाव २२०० रुपयांवरून ३५०० रुपयांपर्यंत वाढला आहे. मात्र, कारखानदारांनी तीन वर्षांत ऊसाला ३१०० वरून २८०० रुपयापर्यंत उसाचा प्रतिटन भाव कमी केला आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या कारखानदारांचा निषेध करण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेने ऐन दिवाळीत कराड तहसील कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन निषेध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या आंदोलनात बळीराजा शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, बी. जी. काका पाटील, प्रदेशाध्यक्ष विश्वास जाधव, जिल्हाध्यक्ष उत्तम खबाले, पोपट जाधव, सचिन पाटील, दीपक पाटील, शंभुराजे पाटील, गणेश शेवाळे, युवा अध्यक्ष बाबा मोहिते, सागर कांबळे आदी सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची संधी ; विद्यापीठ, आयुकातर्फे कार्यक्रम

याबाबत पंजाबराव पाटील म्हणाले की, साखरेचा भाव वाढलेला असताना उसाचा भाव कमी झाला आहे. मागील पाच वर्षांत उसाचा उत्पादन खर्च दुपटीने वाढलेला आहे. शेअर भांडवल दीडपट वाढलेले आहे. मात्र, उसाचा दर तीन वर्षांत कमी केल्याबद्दल साखर कारखानदारांना जाब विचारला पाहिजे.

दर जाहीर केल्यावरच ऊसतोड

आगामी गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर करूनच ऊसतोड सुरू करावी अन्यथा ऊस उत्पादक शेतकरी हे ऊसतोड घेणार नाहीत. साखर कारखान्यांनी याची नोंद घ्यावी, असा इशारा पंजाबराव पाटील यांनी दिला. साखर कारखानदार हे उसाचा दर जाहीर करीत नाहीत, तोपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसतोड घेऊ नये, असे आवाहन पंजाबराव पाटील यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sugarcane farmers agitation against sugar mills pune print news zws