खासदार सुप्रिया सुळे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरकारवर निशाणा साधलाय. रस्त्यावर खड्डे दाखवा हजार रुपये मिळावा! असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते. सुप्रिया सुळे यांनी बोपदेव घाटातील रस्त्याची दुरवस्था दाखून देण्यासाठी चक्क खड्यांसोबतचा सेल्फी ट्विटरवरुन शेअर केलाय.
पुण्यातील कात्रज-उंड्री बायपास आणि बोपदेव घाट परिसरातील रस्त्यांची परिस्थिती राज्यात सर्वत्र पाहायला मिळते. राज्यात असा एकही रस्ता नाही ज्यावर खड्डे नाहीत. खड्ड्यांमुळे वाढलेले अपघात, हकनाक गेलेले बळी याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित करत सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला.
आपले माननीय मंत्रिमहोदय चंद्रकांत पाटील खड्डे दाखवा आणि हजार रुपये मिळवा असे, आवाहन करतात. त्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देऊयात. खड्डे असलेले रस्ते त्यांना दाखवून देऊया, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. भाजपकडून त्यांच्या ट्विटवर काय प्रतिक्रिया येईल, हे पाहणे देखील महत्त्वपूर्ण ठरेल.
#Selfiewithpotholes at Katraj-Undri bypass & Bopdev ghat.@ChDadaPatil pic.twitter.com/IKUdOriSz5
— Supriya Sule (@supriya_sule) November 1, 2017
सुप्रिया सुळे पुरंदर दौऱ्यावर जात असताना कात्रज -उंड्री बायपास आणि बोपदेव घाट या परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी चालकाला आपले वाहन रस्त्याच्या कडेला घ्यायला सांगितले. कारमधून उतरून त्यांनी एका खड्याच्या बाजूला थांबून सेल्फी काढला. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सुळेंनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून फोटो शेअर करत नागरिकांनी देखील आपल्या परिसरातील रस्त्यांची दुरवस्था दाखवून देत सरकारला जागे करावे, असे आवाहन केले आहे.