पुणे : शालेय विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकांची निर्मिती करणाऱ्या बालभारती या संस्थेतील भव्य ग्रंथालय आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. बालभारतीच्या या ग्रंथालयात तब्बल १ लाख ६५ हजार पुस्तकांचा समावेश असून, विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही या पुस्तकठेव्याचा वाचनानंद घेता येणार आहे.

बालभारतीची स्थापना १९६७ मध्ये झाली. शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती या संस्थेतर्फे केली जाते. त्यामुळे बालभारतीचे ग्रंथालय सुसज्ज आहे. आतापर्यंत हे ग्रंथालय सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले नव्हते. मात्र, या पुस्तकांचा अधिकाधिक वापर होण्याच्या दृष्टीने हे ग्रंथालय सर्वांसाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला. बालभारतीच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्या हस्ते ग्रंथालय खुले करण्यात आले. बालभारतीचे जनसंपर्क अधिकारी किरण केंद्र म्हणाले, की बालभारतीमध्ये अभ्यासक्रम तयार करण्यासाठीचे संदर्भ ग्रंथ, पुस्तके असलेले भव्य ग्रंथालय आहे. एकूण १ लाख ६५ हजार ग्रंथ, पुस्तकांचा समावेश आहे. त्यात अनेक मौल्यवान पुस्तके आहेत. विद्यार्थी, अभ्यासक, शिक्षक, संशोधक, तसेच सर्वसामान्य नागरिकांना या ग्रंथालयाचा वापर करता येणार आहे. ग्रंथालयातील ग्रंथ दुर्मिळ असल्याने सध्यातरी ते घरी नेण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र, ग्रंथालयात दिवसभर बसून वाचनाचा आनंद घेता येईल, अभ्यास करता येईल. दिवसाला वीस रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सोमवार ते शुक्रवार (सुटीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत ग्रंथालय खुले राहणार आहे.

हेही वाचा – पुणे : कात्रजमधून खंडणीसाठी महाविद्यालयीन तरुणाचे अपहरण; तरुणाची लोणावळ्यातून सुटका

बालभारती ही मोठा वारसा असलेली संस्था आहे. या संस्थेचे ग्रंथालय अनेकविध विषयांवरील पुस्तके, ग्रंथांनी संपन्न आहे. ग्रंथालये ही वाचनालये झाली पाहिजेत. आतापर्यंत बालभारतीच्या ग्रंथालयाचा वापर संस्थास्तरावरच होत होता. मात्र, या ग्रंथालयातील पुस्तके सर्वसामान्य नागरिकांनाही वाचता येण्यासाठी ते आता खुले करण्यात आले आहे. त्यामुळे या ग्रंथालयाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे. – सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त

हेही वाचा – पुणे : बुधवार पेठेत जुन्या वाड्याची भिंत कोसळली; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे दोघांचे प्राण वाचले

बालभारतीच्या ग्रंथालयाची वैशिष्ट्ये

  • सन १८३७ ची पाठ्यपुस्तके
  • आठ भाषांतील पुस्तके
  • नेचरसारखी महत्त्वाची संशोधन नियतकालिके
  • ८ हजार एन्साक्लोपीडिया
  • विविध देशांतील पाठ्यपुस्तके
  • विविध प्रकारचे कोश
  • कला, साहित्य, विज्ञान, संस्कृती, शिक्षण अशा विविध विषयांवरील अनेक ग्रंथ