पुणे : शहरातील ज्या भागांमध्ये पाण्याचे मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे, तेथील नागरिकांकडून मीटर रीडिंगनुसार पाणीपट्टी घेण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाने मान्यतेसाठी ठेवला आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून या प्रस्तावावर चर्चाच न झाल्याने अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरातील सर्व भागांतील रहिवाशांना समान आणि पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेच्या वतीने समान पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरात सुमारे २ लाख ८० हजार पाण्याचे मीटर बसविले जाणार आहेत. या योजनेत जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले जात असून, शहरातील अनेक भागांत महापालिकेकडून ‘पाण्याचे स्वयंचलित मीटर’ (ऑटोमेटेड मीटर रीडिंग – एएमआर) बसविण्याचे काम सुरू आहे. यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने १४१ स्वतंत्र विभाग तयार केले आहेत.

महापालिकेचे ७२ विभागांचे काम पूर्ण झाले असून, आतापर्यंत १ लाख ८० हजारांपेक्षा अधिक मीटर बसविण्यात आले आहेत. काही विभागांमध्ये मीटर बसविण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे मीटर बसविण्याचे काम पूर्ण झालेल्या भागांमध्ये मीटरच्या रीडिंगनुसार पाणीपट्टी आकारावी, असा प्रस्ताव पाणीपुरवठा विभागाकडून आयुक्तांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘चर्चा’ असा शेरा लिहिला आहे. मात्र, गेल्या महिन्यापासून त्यावर कोणतीही चर्चा न झाल्याने हा प्रस्ताव अद्यापही आयुक्त कार्यालयाकडे पडून आहे.

मीटर बसविण्याचे काम पूर्ण झालेल्या भागात मीटर रीडिंगनुसार पाणीपट्टी घेण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव यापूर्वीच पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांकडे सादर केला होता. मात्र, आयुक्तांनी त्यातील काही तरतुदींबाबत अधिक स्पष्टीकरण मागवले होते. त्यानुसार आता सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी गेल्या आठवड्यात सांगितले. मात्र, त्यानंतरअद्यापही त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने ज्या सोसायट्यांमध्ये पाण्याचे मीटर बसविले आहेत, त्यांना पुरविल्या जाणाऱ्या पाण्याच्या रीडिंगवर सध्या महापालिकेच्या वतीने लक्ष ठेवले जात आहे. मीटर बसविलेल्या भागात नागरिकांकडून पाण्याचा अधिक वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे निवासी नळजोडांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी वापर होतो का, पाण्याची गळती होते का, याची पाहणी केली जात आहे.- नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख, पुणे महापालिका