Pune Porsche Car Accident Update : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आशीर्वादाने ससूमधील २ डॉक्टर काम करत होते, असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या चाचणीत फेरफार करण्यात आल्यानंतर रवींद्र धंगेकरांनी हा आरोप केला. यावरून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच, माफी मागण्याचं आवाहनही केलं आहे. माफी न मागितल्यास अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आज ते माध्यमांशी बोलत होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, “रक्ताच्या नमुन्यात फेरफार करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तपासणीत सांगितलं आहे की डॉ. तावरे यांच्या सागंण्यावरून बदलण्यात आलं आहे. चौकशीमध्ये पोलीस खात्याने जो तपास केलाय त्याची माहिती घेऊ. प्रसंगी त्यांना बडतर्फ करू.”

हेही वाचा >> Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार, अपघातानंतर वडिलांनी केला होता फॉरेन्सिक प्रमुखाला फोन

“रवींद्र धंगेकर पुण्याचे आमदार आहेत, त्यांना स्टंट करण्याची सवय लागली आहे. दोन दिवसांच्या आत त्यांनी माफी मागितली नाही तर बदनामीचा दावा दाखल करेन. कारण , ११ ते २४ मे दरम्यान मी परदेशी दौऱ्यावर होतो. ही घटना घडली तेव्हा मी येथे नव्हतो. वैद्यकीय शिक्षण विभागाचा कारभार हाती घेतल्यानंतर ससूनमध्ये ही तिसरी घटना घडली. ललित प्रकरणात ठाकूर यांना पदमुक्त करण्यात आलं. एकाला निलंबित करण्यात आलं. दुसरी घटना उंदीर प्रकरणीही चौकशी समिती नेमली. आता हे तिसरं प्रकरण आहे. धंगेकरांनी माहिती घ्यावी. येणाऱ्या लोकसभेत त्यांचा पराभव होणार आहे हे माहित असणार असल्याने ते स्टंटबाजी करत आहेत”, असं ते म्हणाले. तसंच, अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांचा फोन जप्त करून त्यांचे फोन रेकॉर्ड्स चेक करण्याचंही आवाहन त्यांनी केलं आहे.

रक्ताच्या नमुन्यात फेरफार

अपघाताला जबाबदार असलेल्या असलेल्या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केलं आहे हे तपासण्यासाठी हे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यावेळी अल्कोहोल न घेतलेल्या व्यक्तीचे नमुने अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने म्हणून दाखवण्यात आले. परिणामी अहवालात त्याच्या शरीरात अल्कोहोल नसल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्याच्या रक्ताची पुन्हा तपासणी करण्यात आली. दुसऱ्यांदा झालेल्या चाचणीत त्याच्या शरीरात अल्कोहोल आढळलं. तसंच, डीएनए चाचणीत दोन्ही चाचण्यातील रक्त नमुने वेगवेगळे असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे आरोपी अल्पवयीन मुलाचे संरक्षण करण्यासाठी सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी पुराव्यांशी छेडछाड केली असल्याचा संशय तपासकर्त्यांना आला.

डॉक्टरांची चौकशी सुरू

डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर असं या डॉक्टरांची नावं असून पुणे गुन्हे शाखेकडून त्यांचा चौकशी केली जात आहे. डॉ. तावरे हे ससूनच्या फोरेन्सिक विभागाचे प्रमुख आहेत. या दोन्ही डॉक्टरांचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत. अपघातानंतर अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी डॉ. तावरे यांना फोन केला होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे.