पुण्यातील स्वारगेट परिसरात मेट्रोच्या मल्टी मोडल हबचे काम सुरु असताना आढळून आलेली दोन भुयार ही पेशवे कालीन नसून ब्रिटिशकालीन असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या भुयारांच्या बांधकामाच्या पद्धतीवरुन ती ब्रिटिशांनी बांधली असावीत अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


स्वारगेट येथील सातारा रोडकडे जाणार्‍या राजर्षी शाहू महाराज पीएमपी डेपोजवळ मेट्रोच्या मल्टी मोडल हबचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी पायलिंग मशीनद्वारे येथे खोदकाम सुरु असून हे काम सुरु असताना तीन दिवसांपूर्वी अचानक जमीन खचली आणि खाली मोठा खड्डा पडला. दरम्यान, मेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी त्या खड्ड्यामध्ये जाऊन पाहणी केली. तर या खड्यात दोन भुयारं असल्याचे आढळून आले.

ही भुयारं तीन दिशांना वळविण्यात आली असून या भुयारापासून ३५ ते ४० मीटर अंतरावरुन मुठा उजवा कालवा वाहतो. ज्याठिकाणी हे भुयार आढळून आले आहे त्या भुयाराची लांबी ५५ मीटर आहे. यातील एका भुयाराची बाजू सारसबागेपासून पर्वती दिशेने वळविण्यात आलेली आहे. तर दुसरी बाजू पूर्व दिशेला गुलटेकडीच्याबाजूला वळविण्यात आलेली आहे. या भुयाराची उंची साधारण १२ फुट असून याचे सिमेंटच्या सहाय्याने पक्के बांधकाम झाले आहे. दरम्यान, मागील तीन दिवसापासून हे भुयार पेशवेकालीन असल्याची चर्चा शहरात सुरू होती. मात्र, याची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पेशवेकालीन नसल्याचा निर्वाळा दिला.


याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास सहाणे म्हणाले, स्वारगेटजवळ भुयार असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन आमच्या पथकाने पाहणी केली. त्याचे व्यवस्थित निरिक्षण केल्यानंतर या भुयाराचे बांधकाम विटा आणि सिमेंटच्या सहाय्याने केल्याचे दिसते आहे. आतमधल्या पाईप लाईननुसार ब्रिटिश काळातील हे भुयार असावे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. या भुयारांची माहिती घेऊन महामेट्रोला सविस्तर अहवाल दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those subways in pune are not from era of peshvas but from britishers says archaeological department