येरवडा कारागृहातील तीन कैद्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. तीन कैद्यांचा मृत्यू वेगवेगळ्या विकारांमुळे झाला असल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. संदेश अनिल गोंडेकर (वय २६, रा. डोणजे, ता. हवेली), शाहरुख बाबू शेख (वय २९, रा. कोंढवा), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय ३२, रा. मोरगाव, ता. बारामती) अशी मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : कोथरूड, शिवाजीनगर परिसराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

गोंडेकर याला २०१८ मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. तो येरवडा कारागृहात होता. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमित जात होते. ३१ डिसेंबर रोजी त्याचे वडील त्याला भेटण्यासाठी कारागृहात गेले होते. त्यानंतर त्यांना हवेली पोलिस ठाण्याकडून मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी मुलाच्या मृत्युस कारागृह प्रशासन जबाबदार असल्याचे सांगून आक्षेप नोंदविला होता. त्याचा मृत्यू यकृतातील विकारामुळे झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले. शाहरुख शेख आणि रंगनाथ दाताळ या कैद्यांना विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते. शेख आणि दाताळ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारागृह प्रशासानाने याबाबतची माहिती शेख आणि दाताळ कुटुंबीयांना दिली आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात शनिवारी (३१ डिसेंबर) संदेश गोंडेकर, शाहरूख शेख आणि रंगनाथ दाताळ या तीन कैद्यांचा मृत्यू झाला. तिघे आजारी होते. आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे, अशी माहिती येरवडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three prisoners die in pune yerawada jail pune print news rbk 25 zws