पुणे : पुणे महापालिकेच्या अंदाजपत्रकात निश्चित केलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी मिळकतकर विभागाने दररोज किमान १० कोटी रुपयांचा मिळकतकर वसूल करण्याचे नियोजन केले आहे. मिळकतकर विभागाने आतापर्यंत दोन हजार कोटी रुपयांचा महसूल जमा केला असून, पुढील दोन महिन्यांत उर्वरित ८०० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान मिळकतकर विभागासमोर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मिळकतकर आकारणी व संकलन विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मिळकतकर निरीक्षक यांची बैठक महापालिकेत झाली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी अधिकारी, निरीक्षकांना मिळकतकर आकारणीसंदर्भात सूचना दिल्या. महापालिकेच्या २०२४-२५ च्या अंदाजपत्रकात महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आलेल्या गावांंसह २८०० कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट मिळकतकर विभागाला देण्यात आले आहे. यापैकी दोन हजार कोटी रुपयांचा कर गोळा झाला आहे. त्यामुळे उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील दोन महिन्यांत नियोजन करण्याच्या सूचना जगताप यांनी बैठकीत दिल्या.

थकबाकी असणाऱ्या किमान १० मिळकतींवर दररोज लिलाव, जप्ती आदी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्य सरकारने समाविष्ट गावातील थकबाकी वसूल करण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे महापालिकेला आपले उद्दिष्ट गाठणे अवघड झाले आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द

आर्थिक वर्ष संपण्यासाठी दोन महिने शिल्लक आहे. या काळात अधिकाधिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. थकबाकी वसुलीसाठी जप्ती व लिलावाची कारवाई केली जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या इतर विभागांतील अतिरिक्त ७५ कर्मचारी मिळकतकर विभागात नियुक्त करण्यात आले आहेत. यासाठी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.

मिळकत कर विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले, मिळकतकराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील दोन महिने विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. थकबाकी वसुलीसाठी जप्ती, तसेच लिलावदेखील केले जाणार आहेत. पुढील काही दिवसांमध्ये थकबाकीदारांच्या मिळकतींचे लिलाव होतील.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To meet its budget target pune municipal corporation plans to collect rs 10 crore daily in taxes pune print news ccm 82 sud 02