पुणे : पालखी आगमनापूर्वी शहरातील रस्ते टप्याटप्याने बंद करण्यात आले. लक्ष्मी रस्त्यासह मध्यभागातील प्रमुख रस्ते, तसेच पालखी मार्गावरील उपरस्ते बांबुचे अडथळे टाकून बंद केल्याने नागरिकांसह वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होतात. पालखी सोहळा पाहण्यासाठी शहर आणि उपनगरातील भाविकांची गर्दी होती. पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनासाठी यंदा पोलिसांनी टप्याटप्याने रस्ते बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.

पालखी आगमनानिमित्त बंद असणारे प्रमुख रस्ते, उपरस्ते, पर्यायी मार्गांची माहिती पोलिसांनी जाहीर केली. पालखी सोहळा नेमका कोणत्या भागात आहे, याची माहिती देण्यासाठी लाईव्ह लोकेशन सुविधा पोलिसांनी उपलब्ध करुन दिली. शुक्रवारी सकाळपासून पालखी मार्ग, उपरस्ते बांबुचे अडथळे टाकून बंद करण्यात आल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. सकाळीच रस्ते बंद केल्याने वाहनचालकही गोंधळून गेले. पालखी सोहळा सायंकाळी दाखल होणार होता. मात्र, सकाळपासून रस्ते बंद केल्याने गोंधळ उडाला. पालखी मार्गावर सकाळपासून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता.

लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्याला जोडणारे उपरस्ते बांबुचे अडथळे टाकून बंद करण्यात आल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना मनस्तापाला सामाेरे जावे लागले. कामानित्त जाणाऱ्या नागरिकांना एक ते दीड किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वळसा मारून जावे लागत होते. गल्ली-बोळात कोंडी झाली होती.

दिडींतील वाहने, वारकऱ्यांची सुरक्षा पालखी आगमनापूर्वी दिंडीतील वाहने पहाटे शहरात दाखल झाली. दिंडीतील वाहनांसह वारकऱ्यांना मार्गस्थ करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सकाळपासून प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद केले होते. दिंडीतील वाहनांना मुक्कामी जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करुन, दिंडीतील वाहने लावण्याची व्यवस्था, तसेच वारकऱ्यांची सुरक्षा विचारात घेऊन प्रमुख रस्ते अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आले होते, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.