पुण्यातील चाकण येथे अल्पवयीन तरुणीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या हत्येचे गूढ अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींना २४ तासांच्या आत अटक करण्याची मागणी केली. एक डिसेंबरला आईसोबतच्या शेतात काम करत असताना तरुणी गायब झाली होती. त्यानंतर ४ डिसेंबरला शेतालगत तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला होता.
दगडाने ठेचून तिची हत्या झाल्याचं निष्पन्न झाले होते. पण, हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर तृप्ती देसाई म्हणाल्या की, पोलिसांनी या गुन्हाचा तपास २४ तासात लावावा. त्यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला. दुर्देवी घटना घडली असून, पालकमंत्र्यांनी याप्रकरणाची अद्याप दखल घेतलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आठ दिवसांपूर्वी कोपर्डीचा निकाल लागला. त्यानंतर हा भयानक प्रकार घडला आहे. यातील आरोपी अद्यापही फरार आहेत. सरकारने या प्रकरणाची गांभिर्याने दखल घ्यावी. तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. महिलांची असुरक्षितता दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे जिल्हयातच नव्हे तर संपूर्ण देशात ही परिस्थिती आहे, असे त्या म्हणाल्या.