पुणे : विधी महाविद्यालय रस्त्यावर मैत्रिणीसोबत मोटारीत गप्पा मारत थांबलेल्या एकाला धमकावून २० हजार रुपये उकळणारे डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश परिमंडळ एकचे प्रभारी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी दिले.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

गणेश तात्यासाहेब देसाई, योगेश नारायण सुतार अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने तक्रार दिली होती. तक्रारदार वारजे भागात राहायला आहे. विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात तक्रारदार मोटारीत मंगळवारी रात्री मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी रात्रपाळीत पोलीस कर्मचारी गणेश देसाई, योगेश सुतार हे गस्त घालत होते. त्या वेळी देसाई आणि सुतार हे तेथे आले. ‘तुमच्याबद्दल तक्रार आली आहे’, असे त्यांनी सांगितले. ‘पोलीस ठाण्यापर्यंत प्रकरण न्यायचे नसेल, तर २० हजार रुपये द्या’, अशी धमकी त्यांनी दिली.

त्यानंतर पोलीस ठाण्यात नेण्याची धमकी देऊन तक्रारदार मोटारचालकाला दुचाकीवर घेऊन पोलीस कर्मचारी देसाई आणि सुतार हे कमला नेहरु पार्क परिसरातील एका एटीएममध्ये नेले. तेथे त्याच्याकडून २० हजार रुपये घेतले.

या घटनेनंतर घाबरलेला मोटारचालक आणि त्याच्या मैत्रिणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी देसाई आणि सुतार यांची चौकशी करण्यात आली. डेक्कन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी दोघांचा कसुरी अहवाल पोलीस उपायुक्त पिंगळे यांच्याकडे पाठविला. ज्या कायद्याचे उल्लंघन त्यांनी केले होते. त्यानुसार कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे होते. मात्र, देसाई आणि सुतार यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली नाही. त्यांच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेऊन दोघांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त पिंगळे यांनी दिले.

बोपदेव घाटात छायाचित्रणासाठी गेलेल्या तरुणाला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळणाऱ्या कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यासह दोघांना नुकतीच अटक करण्यात आली होती. याप्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two pune police employees suspended for extorting money on law college road pune print news rbk 25 asj