पिंपरी : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेने नवीन विकास आराखड्यात (डीपी) आळंदीजवळ टाकलेले कत्तलखान्याचे आरक्षण रद्द केले जाईल,’ अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी दिली. माऊलींचे ७५० वे जन्मोत्सव वर्ष आणि प्रमोद महाराज जगताप यांच्या कार्यगौरव सोहळ्यात सामंत बोलत होते. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना (शिंदे) धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, शांतिब्रह्म मारोती महाराज कुरेकर, मुख्याधिकारी माधव खांडेकर, चैतन्य महाराज देगलूरकर, बंडातात्या कराडकर या वेळी उपस्थित होते.
‘आषाढी वारी ही जगासमोर गेली पाहिजे. वारी भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची होईल, असा प्रयत्न सरकारकडून केला जाईल. सर्वसामान्यांना ज्ञानेेश्वरी मिळण्यासाठी अनुदानाची मागणी होती. त्यानुसार ज्ञानेश्वरीच्या छपाईसाठी अवघ्या आठ तासांत निधी मंजूर केला. संतांचे वैभव टिकवून ठेवण्यासाठी आणि पुढील पिढीला वैभव देण्यासाठी राज्यकर्त्यांचीही तेवढीच जबाबदारी आहे,’ असे सामंत यांनी सांगितले.
‘वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर आल्यावर मानाने बांधलेला वारकरी फेटा हा आयुष्यातील सर्वांत मोठा सन्मान आहे. सर्वसामान्य माणूस जिवाभावाने पंढरीकडे जातो. त्याकडे गेल्यावर सर्व संकटे दूर होतात. महंतांच्या संतांच्या मांदियाळीत माझ्यावरील संकटे आपोआप दूर होतील,’ असे सामंत म्हणाले.
‘आळंदीची वाट धरली’
‘मागील सहा महिन्यांत आळंदीच्या भूमीत येण्याचे भाग्य मला तीन वेळा मिळाले. आळंदी हे आनंदाचे क्षेत्र आहे. राजकारण्यांना वाटेल, की मी आळंदीला सारखा जातो. नवीन मतदरासंघ शोधला की काय? कोकण सोडून आळंदी मतदारसंघ निवडणुकीसाठी शोधला. पण, मी मतदारसंघ शोधला नाही, तर आळंदीची वाट धरली आहे,’ असे सामंत म्हणाले.