पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणातर्फे विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी (युजीसी नेट) अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १० मेपर्यंत अर्ज करता येणार असून, परीक्षा १६ जूनला घेतली जाणार आहे.

एनटीएने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. डिसेंबर आणि जून अशी वर्षातून दोनवेळा युजीसी नेट ही परीक्षा घेतली जाते. युजीसीने जूनमध्ये होणाऱ्या परीक्षेपासून काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार नेट परीक्षेद्वारे कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्तीसह सहायक प्राध्यापक पदासाठीची पात्रता, सहायक प्राध्यापक पदासह पीएच.डी. प्रवेशासाठीची पात्रता, केवळ पीएच.डी.साठी प्रवेश दिला जाणार आहे. तसेच चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या, शेवटच्या सत्राच्या विद्यार्थ्यांनाही थेट पीएच.डी.ला प्रवेश देण्यासाठी नेट परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे जूनमध्ये होणारी परीक्षा अधिक महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : पुणे : अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका; हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ

अधिकृत सूचनेनुसार, १६ जूनला होणारी परीक्षा ८३ विषयांसाठी घेतली जाणार आहे. ही परीक्षा एक किंवा अधिक सत्रांमध्ये घेतली जाईल. परीक्षेतील दोन्ही प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. उमेदवारांना दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी तीन तासांचा अवधी दिला जाईल.