पुणे : लोहगाव विमानतळ परिसरात पक्ष्यांचा आणि भटक्या श्वानांचा वावर वाढल्याने विमानांना धोका निर्माण झाला आहे. ‘महापालिका, विमानतळ प्राधिकरण व हवाई दलाने एकत्रितपणे, समन्वयाने काम करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात,’ अशा सूचना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या.

लोहगाव विमानतळावर भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेत बैठक घेतली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी, हवाई दलाचे अधिकारी, विमानतळ प्राधिकरणाचे प्रतिनिधी, वनविभाग व वन्यजीवांसंदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

विमानतळाच्या आजूबाजूला साठलेल्या कचऱ्यामुळे तसेच अन्य कारणांमुळे विमानतळ परिसरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. या वेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये धावपट्टी परिसरात वाढलेला श्वानांचा वावर, विमानतळ परिसरातील पक्षांची वाढणारी संख्या, विमानतळ परिसरात दिसलेला बिबट्या या विषयांचा समावेश होता.

विमानतळ परिसरातील पाच-सहा किलोमीटर परिसरात कचरा टाकली जाणारी १८ ठिकाणे विमानतळ प्रशासन व हवाई दलाने शोधून काढली आहेत. यामध्ये वाघोली येथील मंडई, हडपसर येथील कचरा वर्गीकरण प्रकल्प यांचा समावेश आहे. येथे तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणे आणि अनधिकृत व्यवसायामुळे कचरा निर्माण होत आहे. त्यासाठी स्थिर पथके नेमण्याच्या तसेच नियमित कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले.

येरवडा कारागृहापासून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण मंत्रालयाची जागा आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी संरक्षण विभागाने कामासाठीची परवानगी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

बिबट्याला शोधण्यासाठी प्रयत्न

 ‘विमानतळ परिसरात काही दिवसांपूर्वी बिबट्या आढळला होता. बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागासह यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत. बिबट्याचे विमानतळात येण्याचे व बाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. विमानतळ परिसरात येणाऱ्या भटक्या श्वानांवरही योग्य उपाय करण्यात आले आहेत. लवकरच बिबट्या ताब्यात येईल,’ असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

‘विमानतळाच्या आत कुठेही गळती नाही’

‘पावसात विमानतळामध्ये पाण्याची गळती होत होती, हे साफ चुकीचे आहे. विमानतळाच्या आत कुठेही गळती होत नव्हती. पावसामुळे विमानतळाबाहेरील ड्रेनेज चेंबरमधून गळती होत होती. त्यावर पालिका उपाययोजना करत आहेत. विमानतळात गळती होत असल्याचे आरोप राजकीय हेतूने केले गेले आहेत,’ असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

विमानतळ परिसरात असलेल्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा झाली. पुणे महापालिका, विमानतळ प्रशासन यांच्यासह संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री