वसंत प्रसादे
रामभाऊ म्हाळगी यांच्याबरोबर काम करीत असताना खूप शिकायला, अनुभवायला मिळाले. मी १९६० पासून वेगवेगळ्या ११ निवडणुकांमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून भूमिका बजावली. शनिवारवाडा वॉर्ड क्रमांक २१ मधून १९७४ ते ७९ आणि १९७९ ते ८५ अशा दोन टर्म नगरसेवक म्हणून मी निवडून आलो. निवडणुकीच्या आधी साधारण वर्षभर आम्ही कार्यकर्ते तयारी सुरू करायचो. पहिल्या फेरीत सर्व मतदारांची यादी तपासायची. दुसऱ्या फेरीत ज्यांची नावे नाहीत, त्यांची नावे समाविष्ट करायची. नाव बरोबर आहे का?, काही बदल आहेत का? अशी तिसरी फेरी व्हायची. या तीन फेऱ्यांमध्येच मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क होऊन वॉर्डमधील कोण कुठे राहतो, कुटुंबात किती व्यक्ती आहेत हे माहिती व्हायचे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर तुम्हाला उभे राहायचे आहे, त्या दृष्टीने तयारी करा, असा आदेश पक्षाकडून मिळायचा. त्यानंतर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित, प्रमुखांच्या गाठीभेटी घ्यायचो. पाच-सहा फेऱ्यांच्या माध्यमातून मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क व्हायचा. आम्ही फिरायचो तेव्हा पक्षाच्या निधीचे पुस्तकही बरोबर असायचे. घरोघरी जाऊन कार्यकर्ते पक्षासाठी निधी मागायचे आणि जे पक्षाला निधी द्यायचे ते मतदार आपल्याला मतदान करणार हे आम्ही निश्चित समजायचो. आठ दिवस आधी आमचे हजारीप्रमुख किती मतदान होईल याचा अंदाज काढायचे. अशी संघटनात्मक कामाची आमच्या वेळी पद्धत होती आणि प्रचार ‘मॅन टू मॅन’ असायचा. सन १९७९ साली निवडणुकीच्या एक महिना आधी माझ्या ध्यानीमनी नसताना रामभाऊ म्हाळगी यांनी ‘तू निवडणूक लढवायची आहेस,’ असे मला सांगितले. केवळ रामभाऊंच्या सांगण्यावरून निवडणूक लढविली. पहिल्या निवडणुकीत मला फक्त साडेतीन हजार रुपये खर्च आला. त्यातील दोन हजार रुपये कार्यकर्त्यांनी गोळा केले होते. त्यानंतर आणीबाणीत तीन महिने तुरुंगवास भोगून आल्यावर दुसऱ्या निवडणुकीत सहा हजार खर्च आला. अण्णा जोशी, अरविंद लेले, नारायणराव गोडबोले, नारायणराव वैद्य हे माझ्याबरोबर होते. सध्याचे आमदार विजय काळे, ज्योत्स्ना सरदेशपांडे यांनी हजारीप्रमुख म्हणून माझे काम केले होते.