|| अविनाश कवठेकर

पर्वती मतदार संघामधील भारतीय जनता पक्षाची ताकद लक्षात घेता भाजपच्या उमेदवाराला लढत देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही पर्वती मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाकी लढत दिली जात असल्याचे चित्र आहे. भाजपच्या विद्यमान आमदार आणि शहराध्यक्ष माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या, नगरसेविका अश्विनी कदम अशी लढत या मतदार संघात आहे.

पर्वती विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची संख्या २७ असून त्यामध्ये भाजपचे २३ नगरसेवक आहेत. या भागात भाजपची संघटनात्मक बांधणी भक्कम आहे. महापालिका निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर आले. विधानसभा निवडणुकीतही भाजपला सातत्याने यश मिळाले आहे. महापालिका निवडणुकीत या मतदार संघातून मोठय़ा संख्येने पक्षाचे नगरसेवक विजयी झाले. विद्यमान आमदार, महापालिकेतील सभागृहनेता आणि स्थायी समिती अध्यक्षही याच मतदार संघातील आहेत. माधुरी मिसाळ या पूर्वी दोन वेळा मोठय़ा मताधिक्याने या मतदार संघातून विजयी झाल्या आहेत.

काँग्रेसचा एके काळचा बालेकिल्ला ते भारतीय जनता पक्षाचा मतदार संघ, अशी पर्वती मतदार संघाची ओळख झाली आहे. महापालिका निवडणुकीतही भाजपचेच शत प्रतिशत नगरसेवक येथून विजयी झाले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी झाली नाही. त्यामुळे सर्व पक्ष स्वतंत्र लढले. भाजप आणि शिवसेना अशीच थेट लढत  इथे झाली. त्यामध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी शिवसेना उमेदवाराला पराभूत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या आणि काँग्रेसचा चौथ्या स्थानी राहिला. त्यामुळे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदार संघात तशी ताकद नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

आघाडीच्या जागा वाटपात पर्वती मतदार संघ काँग्रेसला मिळाला नाही, त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी बंडखोरी केली. मात्र प्रदेशाध्यक्षांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मतदार संघात आघाडी असली, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मतदार नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसपुढेच आव्हान निर्माण झाले आहे. हा मतदार संघ सिंहगड रस्ता परिसरापर्यंत आहे. मात्र भाजपच्या भक्कम संघटनेचा मुकाबला आघाडीचा उमेदवार कसा करणार, हा प्रश्न आहे. तत्पूर्वी सन २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला येथे दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार १५ हजारांच्या फरकाने पराभूत झाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली होती. मात्र महापालिका निवडणुकीपासून बदलेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपुढे निश्चितच आव्हान असणार आहे. त्यातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमधील अंतर्गत वादाचा फटकाही राष्ट्रवादी काँग्रेसला बसण्याची भीती आहे. त्यामुळे तूर्तास पर्वती विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसची एकाकी लढत असल्याचे दिसत आहे.