तडजोडीनंतर महिलेला चोवीस लाखांची भरपाई  

पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर त्या महिलेने विमा कंपनीविरुद्ध दावा दाखल केला. न्यायालयाने बाजूने निकाल दिल्यानंतर महिलेने मुलांच्या भवितव्याचा विचार करून विमा कंपनीशी तडजोड केली. उच्च न्यायालयात सुनावणीसाठी लागणारा कालावधी विचारात घेऊन तिने ठरलेल्या रकमेपेक्षा तीन लाख रुपये कमी घेतले आणि उच्च न्यायालयात झालेल्या तडजोडीनुसार संबंधित महिलेला आता चोवीस लाख रुपये मिळणार आहेत.

रहाटणी भागातील रहिवासी कुमार गोपाळ शिंदे (वय ४३) यांचा सन २७ फेब्रुवारी २०१२ रोजी अपघाती मृत्यू झाला. दुचाकीस्वार शिंदे यांना मोटारीने धडक दिली होती. रहाटणी भागातील एका पतसंस्थेत ते दैनंदिन ठेव योजनेत ठेव गोळा करण्याचे काम करायचे. त्यातून त्यांना दरमहा पंधरा हजार रुपये उत्पन्न मिळत होते. शिंदे यांच्या मासिक उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आणि आई असा परिवार आहे. पतीच्या निधनानंतर उदरनिर्वाह तसेच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शिंदे यांची पत्नी संगीता यांनी वकील अ‍ॅड. जी. पी. शिंदे यांच्या मार्फत मोटार अपघात प्राधिकरणात न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्या विरोधात दावा दाखल केला होता.

शिवाजीनगर येथील मोटार अपघात प्राधिकरणात या प्रकरणावर सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशाने शिंदे कुटुंबीयांना २७ लाख १४ हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान, विमा कंपनीकडून मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर निकालासाठी नेमका किती कालावधी लागेल हे निश्चित नव्हते. संगीता यांना चौदा आणि सोळा वर्षांचे दोन मुलगे आहेत. त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी त्यांच्यावर होती, त्यामुळे त्यांच्या भवितव्याचा विचार करून नुकसानभरपाई लवकर मिळणे गरजेचे होते.

संगीता यांनी न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. अ‍ॅड. जी. पी. शिंदे यांनी तडजोडीच्या दृष्टीने प्रयत्न सुरू  केले. उच्च न्यायालयात सुनावणीसाठी लागणारा कालावधी, त्यानंतर मिळणारी नुकसानभरपाई अशा अनेक बाबींवर चर्चा करण्यात आली.

अखेर संगीता यांनी तडजोडीचा निर्णय घेतला. आर्थिक बाजूचा विचार करून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात विमा कंपनीशी चर्चा केली. विमा कंपनीच्या वतीने अ‍ॅड. सी. डी. अय्यर यांनी काम पाहिले. उभय पक्षातील चर्चेनंतर आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर संगीता यांना चोवीस लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपनीने मान्य केले.